मोरजी समुद्रकिनारा

आकर्षक समुद्रकिनाऱ्यांमुळे गोव्याचे जगभरात नाव झाले आहे. एवढेच नाही, तर गोव्यातील काही किनारे विदेशातील काही देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. असाच उत्तर गोव्यातील मोरजी समुद्रकिनारा आहे, जो रशियामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. रशियातील लाखो पर्यटक दरवर्षी येथे आवर्जून येतात. मोरजी किनारा हा उत्तर गोव्यातील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. रशियाच्या पर्यटकांमध्ये मोठ्या लोकप्रियतेमुळे ‘लिटल रशिया’ म्हणूनही तो ओळखला जातो.

या किनाऱ्याचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन केले जाते. कासव संवर्धन केंद्र म्हणूनही हा किनारा मोलाची भूमिका बजावतो. या किनाऱ्यावरुन गोव्यातील सूर्योदयाचे सर्वोत्तम दृश्य अनुभवता येते. अशा प्रकारे, सुंदर सूर्योदयाचा आनंद घेण्यासाठी आणि पहाटे किनाऱ्यावरुन चालण्याचा आनंद घेण्यासाठी लवकर उठून अनेक पर्यटक येथे येत असतात. मोरजी समुद्रकिनाऱ्यावरील ‘शॅक्स’ वर उत्तम प्रकारे नाश्ता मिळतो. यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थांसह देशी-विदेशी पदार्थही असतात. ही ‘शॅक्स’ सकाळी खूप लवकर उघडतात.

‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या लुप्तप्राय प्रजाती येथे संवर्धित केल्या जातात. ही कासवे येथे पाहता येतात. गोव्यातील हा सर्वात अनोखा अनुभव आहे. हा किनारा पहायला गेल्यावर आसपास अन्य काही आकर्षित करणारी स्थळे आहेत. ती पाहू शकता. ‘शापोरा’ नदीवरील पर्यटन पाहू शकता. ही गोव्यातील प्रसिद्ध नदी आहे. या नदीवर १ ते २ तास किंवा अर्धा दिवस किंवा रात्रभर हाऊसबोट क्रूझचा आनंद लुटू शकता. येथे सूर्यास्त समुद्रपर्यटन देखील उपलब्ध असते. मोरजी किनारा आणि लगतची शापोरा नदी ही पक्षीप्रेमींसाठी आकर्षणाची ठिकाणे आहेत. किंगफिशर, कोकिळा, सँडपायपर्स, बे-बॅक्ड श्राइक आणि सँड प्लोव्हर यासह अनेक पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात.

मोरजीमध्ये निवासाचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कॉटेज आणि गेस्ट हाऊस यांचा समावेश आहे. बहुतेक हॉटेल्स समुद्राला समांतर वाहणाऱ्या रस्त्यावर वसलेली आहेत. त्यापैकी काही नदीकाठी वसलेली आहेत. येथून ‘शापोरा’ची दृश्ये देतात. मोरजीमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि लक्झरी दोन्ही श्रेणीतील हॉटेल्स उपलब्ध असतात. या किनाऱ्याला ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भेट द्यावी. यावेळी हवामान आल्हाददायक असते, पाऊस नसतो. त्यामुळे समुद्रही शांत असतो. या परिसरात देखणी मंदिरे, स्थानिक उद्यानेही आहेत. येथे जायचे झाल्यास विमानप्रवास असल्यास मोपा विमानतळावर उतरावे. हे विमानतळ आणि हा किनारा एकाच पेडणे तालुक्यात आहेत. रेल्वे प्रवास केल्यास पेडणे रेल्वेस्थानक, थिवी रेल्वेस्थानक जवळ आहेत.







10,607