मुंबई–गोवा महामार्गाचे काम चार महिन्यांत पूर्ण होणार

मुंबई–गोवा महामार्ग प्रकल्पाबाबत आता निर्णायक पावले उचलली जात असून, हे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली असून, कामात कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही संबंधित कंत्राटदारांना दिला आहे.

या महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले होते. मात्र, आता सर्व अडथळे दूर करण्यात आले असून, पुढील चार महिन्यांत हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचा निर्धार गडकरींनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “मी याआधीच वेळोवेळी मुदत दिल्या आहेत, आता अंतिम मुदत आहे. जर वेळेत काम पूर्ण झाले नाही, तर कठोर निर्णय घ्यावा लागेल.”

नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे केवळ प्रवाशांचेच नव्हे, तर कोकणातील पर्यटन, व्यापार, कृषी आणि स्थानिक उद्योगांनाही मोठा लाभ होणार आहे.

दरम्यान, देशातील टोल संकल्पनेत बदल करण्यासाठी सरकार नवी धोरण आखत आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. “आगामी १५ दिवसांत नवीन टोल धोरण जाहीर केले जाईल, ज्यामध्ये सॅटेलाइटद्वारे वाहनांची ओळख पटवली जाईल. नंबर प्लेट वाचणाऱ्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक टोल नाके हळूहळू बंद होतील,” अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबई–गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील कोकण भागाचा विकास वेगाने होईल आणि मुंबई-गोवा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सरकारकडून या प्रकल्पावर सतत देखरेख ठेवली जात असून, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही गडकरी यांनी ठणकावून सांगितले.






4,20,042 वेळा पाहिलं