मुंबई–सोलापूर विमानसेवा प्रकल्प रखडणार

सोलापूरकर जनतेसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मुंबई–सोलापूर विमानसेवेचा मार्ग सध्या रखडल्याचे चित्र दिसत आहे. या प्रस्तावित सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक निधी अद्याप मंजूर न झाल्यामुळे प्रकल्प पुढे सरकू शकलेला नाही.
या विमानसेवेची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या सेवेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून प्रत्यक्ष निधी न मिळाल्याने सध्या ही सेवा कधी सुरू होणार, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सोलापूर व मुंबई यांच्यातील प्रवासासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार होती. व्यवसाय, वैद्यकीय उपचार, शिक्षण व प्रशासकीय कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांना प्रवास करावा लागतो. विमानसेवा सुरू झाल्यास वेळेची मोठी बचत होणार होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विमानतळावर काही पायाभूत सुधारणा करण्यात आल्या असून, काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. विमान कंपन्यांशी प्राथमिक चर्चा देखील पूर्ण झाली आहे, पण निधीअभावी अंतिम निर्णय घेण्यात प्रशासन हतबल असल्याचे समजते.
स्थानिक जनप्रतिनिधी, व्यापारी व उद्योग संघटनांकडून आता शासनावर दबाव वाढू लागला आहे. या सेवेसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून सेवा प्रत्यक्षात सुरू करण्यात यावी, अशी मागणी सोलापूरकरांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.