मुंबईतील हवेचा निर्देशांक खालावला – आरोग्याचा धोका वाढला
मुंबईतील हवेच्या प्रदूषणाने पुन्हा एकदा चिंतेत भर घातली आहे. प्रशासकीय प्रयत्नांनंतरही अनेक भागांत हवेचा दर्जा खालावलेला असून, वांद्रे – कुर्ला संकुलासारख्या व्यावसायिक क्षेत्रांत आरोग्यदायी स्थिती धोक्यात आली आहे. मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची चादर गडद होताना दिसत आहे. मंगळवारी दुपारपर्यंत शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक जरी मध्यम श्रेणीत असला, तरी अनेक महत्त्वाच्या भागांत पहाटेपासूनच हवेची स्थिती वाईट श्रेणीत पोहोचली होती. समीर या अधिकृत ॲपद्वारे नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुल या ठिकाणी हवेचा निर्देशांक दोनशे सतरा इतका विक्रमी नोंदवला गेला. हा निर्देशांक वाईट श्रेणीत मोडतो, जो श्वसनाच्या विकारांसाठी अत्यंत धोकादायक आहे. या हवेत दोन पूर्णांक पाच पीएम आणि दहा पीएम या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक आढळले. हे कण थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचत असल्याने आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील काही उपनगरांमध्ये हवा समाधानकारक असली, तरी औद्योगिक आणि बांधकाम सुरू असलेल्या क्षेत्रांत प्रदूषणाची तीव्रता कायम आहे.
मुंबई महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये रस्ते धुणे, बांधकामाच्या ठिकाणी फॉग गनचा वापर करणे आणि अँटी-डस्ट स्क्रीनिंग लावणे यांचा समावेश आहे. मात्र, वाऱ्याचा मंद वेग आणि सातत्याने सुरू असलेली बांधकामे यामुळे या प्रयत्नांना यश मिळताना दिसत नाहीये.
हवेतील विषारी कणांचे वाढते प्रमाण खालील समस्यांना निमंत्रण देऊ शकते. दमा आणि श्वसनाचे असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होणे. हवेतील धूलिकणांमुळे डोळ्यांना खाज येणे किंवा पाणी येणे. दीर्घकाळ अशा प्रदूषित हवेत राहिल्याने हृदयविकाराचा धोका संभवतो. प्रदूषणाची वाढती पातळी पाहता, मुंबईकरांनी सकाळी लवकर फिरताना किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे आवश्यक झाले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.