दहिसरमध्ये मुंबईतले पहिले खारफुटीचे पार्क उभारणार – पर्यटनाला चालना

मुंबईत गोराई खारफुटीचे पार्क आणि दहिसर खारफुटीचे पार्क हे प्रकल्प उभे राहणार आहेत. सुमारे एकशे दहा कोटी रुपये खर्चून हे प्रकल्प उभे राहणार आहेत. यामुळे उत्तर मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळेल.

हे भारतातील पहिले खारफुटीचे थीम आधारित नागरी जैवविविधता उद्यान ठरेल. या दोन्ही प्रकल्पांचा अंदाजित खर्च सुमारे शंभर कोटी रुपये आहे. यामधील गोराई प्रकल्पासाठी तीस कोटींचा खर्च आला आहे. हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे.

याठिकाणी आठशे मीटर लांबीचा पर्यावरणपूरक उंच लाकडी मार्ग बांधण्यात येईल. यामुळे खारफुटीच्या जंगलांचा जवळून अनुभव घेता येईल. दोन मजली इमारत बांधून माहिती प्रदान करण्यात येईल. विशेष गोष्ट म्हणजे या प्रकल्पात एकाही खारफुटीच्या झाडाची कत्तल करण्यात आलेली नाही. हा मुंबईच्या पर्यावरणपूरक पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

दहीसरच्या प्रकल्पासाठी अंदाजे ऐशी कोटी खर्च येणार असून त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे तीस हेक्टर आहे. या प्रकल्पाला अधिकृतरीत्या पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प म्हणून मंजुरी मिळाली आहे. याठिकाणी निसर्ग माहिती केंद्र आणि चारशे मीटर लांबीचा खारफुटीचा पादचारी मार्ग बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तरंगता धक्का आणि कायाकिंगसाठीचे जलमार्ग करण्यात येतील.

हे दोन्ही प्रकल्प शाश्वत पर्यटनाला चालना देतील आणि नैसर्गिक आपत्तींपासून शहराचे नैसर्गिक संरक्षण करतील.






2,622 वेळा पाहिलं