आंबोलीतील नारायणगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आंबोलीतील ‘कावळेसाद पॉंईंट’ या पर्यटन ठिकाणाच्या विरुद्ध बाजूस ‘नारायणगड’ हा किल्ला आहे. पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘नारायणगड’ हा किल्ला बांधण्यात आला.नारायणगडाच्या पायथ्याशी ‘गेळे’ गाव असून याच गावातून गडावर जावे लागते. आंबोली घाटाच्या परिसरात असल्यामुळे पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर गडावर जाता येते.

‘गेळे’ गावातून गडावर जातांना फारसा चढाव नसून सरळ वाट आहे. या भागात वावर नसल्यामुळे आजूबाजूला घनदाट अरण्य आहे. ‘नारायणगड’ सावंतवाडी संस्थानाच्या फोंड सावंतांनी बांधला. किल्ल्यावर सातेरीदेवीचे स्थान आहे. एका झाडाखाली काही घडीव दगड पडलेले आहेत; पण या जागी मूर्ती नाही. तसेच गडावर घराच्या जोत्यांचे काही अवशेष पहायला मिळतात. गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड, पूर्वेला ‘कावळेसाद पॉंईंट’ दिसतो. नारायण गडाच्या बाजूला ३ सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक ‘गंगोत्री लगीनवाडा’ म्हणतात

. सुळक्यांमधील मोठ्या सुळक्याला ‘म्हातारीचा गुंडा’ म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा आणि नवरी म्हणतात.
नारायणगड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाडीपासून ३२ किमी अंतरावर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते.

आंबोलीपासून गेळे हे नारायणगडाच्या पायथ्याचे गाव ७ किमी अंतरावर आहे. गडावर जाण्यासाठी माहितगार सोबत असणे आवश्यक आहे. गेळे गावातून नारायण गडावर जाण्यासाठी १ तास लागतो. पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर गडावर जाता येते.

आंबोलीत वर्षा पर्यटन दरवर्षी उल्हासित स्वरूपाचे असते. दाट धूक्यात लपेटलेल्या गारव्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आवर्जून उपस्थित असतात. ‘कावळेसाद पॉईंट’ हा तर आंबोली पर्यटनातील प्रमुख आकर्षण आहे. मात्र, नारायणगड या किल्ल्याविषयी मात्र कित्येकांना माहिती नाही. हा ऐतिहासिक ठेवासुद्धा पर्यटकांनी पाहणे गरजेचे आहे. आंबोली पावसाळ्यात तर पर्यटकांनी फुलून गेलेली असते. काळ्या कपारीतून कोसळणारे धबधबे, घनदाट निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी देशाच्या विविध भागातून पर्यटक येत असतात; परंतु त्यामध्ये नारायणगडाकडे जाणारे अत्यंत कमी म्हणण्यापेक्षा नसतातच ! यासाठी या गडाकडे जाणारी वाट प्रशासनाने व्यवस्थित करणे आवश्यक आहे. त्याकरिता याबाबत शासन स्तरावरही गडाची डागडुजी होणे गरजेचे आहे.






23,304 वेळा पाहिलं