नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर अखेरीस सुरू होणार

नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर प्रत्यक्षात येण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत माहिती दिली की, नवी मुंबई विमानतळाचे पहिले टप्प्यातील काम पूर्ण होत आले असून, हे विमानतळ येत्या सप्टेंबर अखेरीस सुरू करण्यात येणार आहे.

याआधी हे विमानतळ ऑगस्ट अखेरीस सुरू होईल, अशी शक्यता होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे त्यात थोडा विलंब झाला आहे.

उदय सामंत यांनी स्पष्ट केलं की, विमानतळाचं सुमारे पन्नास टक्के काम पूर्ण झालं आहे, आणि उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे विमानतळाचे प्रारंभिक संचालन लवकरच सुरू होईल. सुरुवातीला मर्यादित उड्डाणांसह सेवा सुरू होणार असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण विमानतळ कार्यरत होईल.

विमानतळ प्रकल्पाबाबत सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांनीही अलीकडे पाहणी केली होती. त्यांनी देखील सप्टेंबर अखेरीस हे विमानतळ सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.

नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे, तसेच ठाणे, पुणे, पनवेल, कल्याण आणि नवी मुंबईसारख्या भागातील नागरिकांना अधिक सोयीस्कर पर्याय मिळणार आहे.

या विमानतळास जलमार्ग, लोहमार्ग, बुलेट रेल्वे आणि द्रुतगती महामार्गाद्वारे चांगली जोड मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठीही मोठी संधी ठरणार आहे.






14,968 वेळा पाहिलं