
मुंबईतील नेहरू तारांगण हे वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय शिक्षणासाठी असलेले एक प्रमुख ठिकाण आहे. नेहरू तारांगण मनोरंजनासोबतच विविध व्याख्याने, कार्यक्रम आणि प्रख्यात अवकाश संशोधकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथे मुलांना प्रत्यक्ष तारे–ग्रह कशा पद्धतीने अंतराळात विहार करतात, हे पाहता येते. हा खूप सुंदर अनुभव असतो.
याची रचना वास्तुविशारद जे.एम. कादरी यांनी केली आहे. सुंदर घुमटाकार इमारत असलेली दंडगोलाकार रचना अनेकांना आकर्षित करते. विद्यार्थी, खगोलशास्त्रज्ञ आणि इतर अंतराळ संशोधक येथे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना आवर्जून भेट देतात. अधूनमधून, येथे सांस्कृतिक कार्यक्रमदेखील पहायला मिळतात.
अंतराळ अभ्यासाला वाहिलेली ‘नेहरू तारांगण’ ही संस्था विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांमधील आकर्षणाचे केंद्र आहे. विज्ञान आणि अवकाश याविषयी मुलांच्या मनात आवड निर्माण करण्यासाठी मुंबईतील ‘नेहरू तारांगण’ हे एक चांगले ठिकाण आहे. नेहरू तारांगण विज्ञान आणि मानवतेच्या अभ्यासासाठी स्थापन केले गेले.
गेल्या काही वर्षांत, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्र हे खगोलशास्त्रातील ख्यातनाम शास्त्रज्ञ, संशोधक आणि इतरांसाठी आकाशातील ग्रहांचा आणि सर्व हालचालींचा अभ्यास करण्यासाठी आवडते ठिकाण बनले आहे. येथे विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, खगोलशास्त्रावर आधारित चित्रकला स्पर्धा आणि वादविवादही होतात.
सूर्यमालेचे दर्शन – नेहरू तारांगणातील “स्टार्स अँड वंडर्स ऑफ द युनिव्हर्स” हा नियमित कार्यक्रम आहे. प्रोजेक्टर प्रतिमा प्रदर्शित करीत असताना निवेदक सूर्यमाला, आपल्या ग्रहाची उत्क्रांती आणि आपल्या विश्वातील इतर रहस्यांबद्दल माहिती देतात. 90 मिनिटांच्या या कार्यक्रमामध्ये दिवसभरात 4 सत्रे असतात. 2 सत्रे हिंदीत दिली तर इतर दोन इंग्रजी आणि मराठीत सांगितली जातात.
वैश्विक घटनेचे साक्षीदार – जर तुम्ही सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या दिवशी मुंबईत असाल, तर नेहरू तारांगण हे प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचे उत्तम ठिकाण आहे. याठिकाणी तुम्हाला पाहण्याचा अनुभव देण्यासाठी सुविधा आणि आवश्यक उपकरणे आहेत. स्टार गेझिंग – नेहरू तारांगणामध्ये इमारतीच्या बाहेर दुर्बिणी आहेत. दुर्बिणीद्वारे विशाल आकाशगंगेकडे पाहू शकता.
डिस्कव्हरी ऑफ इंडिया – येथे अनेक प्रदर्शने, गॅलरी आणि प्रेक्षागृहे देखील आहेत. येथे विविध मैफिली आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ग्रंथालय – नेहरू तारांगण ग्रंथालयात सुमारे 30,000 पुस्तकांचा संग्रह आहे. ही पुस्तके धर्मापासून संबंधित विज्ञानांपर्यंत, तत्त्वज्ञानापासून सामाजिक शास्त्रापर्यंत आणि अगदी कला आणि वास्तुशास्त्रापर्यंत ग्रंथ आहेत. विद्यार्थी अनेकदा या ठिकाणी भेट देतात. हे ठिकाण सोमवार आणि काही सण वगळता वर्षभर खुले असते. ते सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुले असते.
नेहरू तारांगण मुंबईत वरळी येथे आहे. येथून रेल्वे स्थानक व बस डेपो जवळ आहे. वरळीमध्ये दिवसभर बेस्ट बसेस असतात. खासगी कॅब देखील भाड्याने घेऊ शकता. तुम्ही शहरातील कोठूनही तारांगणात जाण्यासाठी मुंबई लोकल ट्रेनमध्ये चढू शकता. महालक्ष्मी, भायखळा आणि चिंचपोकळी ही तारांगणाच्या जवळच्या स्थानकांपैकी एक आहेत.