राज्यात गरजेनुसार नवीन अंगणवाड्या सुरू होणार

राज्यातील बालविकास सेवेला गती देण्यासाठी आणि बालसंगोपन योजनांचा प्रभाव वाढविण्यासाठी ज्या भागात लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाडी केंद्रांची कमतरता आहे, त्या ठिकाणी नवीन अंगणवाड्या सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसेच, मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

महिला व बालविकास विभागाच्या दीडशे दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. या बैठकीत अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या पदोन्नतीचा प्रश्न, अहिल्याभवन उभारणीसाठी जागा निश्चिती, तसेच बालसंगोपन योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, सहसचिव वि.रा. ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात अहिल्याभवन अथवा महिलांसाठी वसतीगृह उभारण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी अशा सुविधा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अंगणवाड्यांमधील असमतोल स्थितीवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. काही केंद्रांमध्ये विद्यार्थीसंख्या अधिक असून सेविका व मदतनीस कमी आहेत, तर काही ठिकाणी विद्यार्थीसंख्या कमी असून कर्मचारी अधिक आहेत. त्यामुळे अशा केंद्रांमध्ये सेविका व मदतनीस यांची पुनर्नियुक्ती करून संसाधनांचे योग्य नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

नवीन अंगणवाड्यांची आवश्यकता असलेल्या प्रदेशांबाबत सर्वेक्षण करून त्या भागांमध्ये नवीन केंद्रे सुरू करण्यात यावीत, तसेच आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमणूक करावी, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. याशिवाय ग्रामविकास विभागातून महिला व बालविकास विभागात पर्यवेक्षिका व जिल्हा पर्यवेक्षिका वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचाही त्यांनी आदेश दिला.






21,488 वेळा पाहिलं