नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाला नवी दिशा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे देशातील तरुणाईसाठी भविष्यदर्शी पाऊल ठरत असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की हे धोरण विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढवून त्यांना आधुनिक स्पर्धात्मक जगात अधिक सक्षम बनविणारे आहे. संशोधनाला चालना देणे, कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर देणे तसेच उद्योगजगताशी शैक्षणिक समन्वय मजबूत करणे हे या धोरणाचे प्रमुख आधार आहेत.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित ‘नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर’ या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात शालेय स्तरापासून डिझाईन शिक्षणाची गरज, करिअरच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, तसेच विद्यापीठे आणि उद्योग क्षेत्रातील सहयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या माध्यमातून महाराष्ट्रातील डिझाईन गुणवत्तेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोच मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “नवीन शैक्षणिक धोरणात नवउद्योजक आणि नवप्रवर्तकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच बाजारपेठेपर्यंत पोहोच साधण्यासाठीही शासन मदत करत आहे. याच पाठबळामुळे भारतातील स्टार्टअप संस्कृती अधिक बळकट होत असून देश या क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचत आहे. डिझाईनच्या माध्यमातून युवकांना कौशल्याधारित करिअरची नवी दालने उघडत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

कला आणि सर्जनशीलता या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. डिझाईन हा जीवनाच्या प्रत्येक अंगाशी जोडलेला घटक आहे. आज डिझाईन म्हणजे केवळ चित्रकला नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि मानवी गरजा यांचा संतुलित संगम आहे. उर्मीज आर्ट फोरमद्वारे आयोजित हे प्रदर्शन महाराष्ट्रातील तरुण प्रतिभेला योग्य दिशा देणारा उपक्रम ठरेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

अभियांत्रिकी, वास्तुकला, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, उत्पादन, डिजिटल सामग्री, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत डिझाईन विचारसरणी हेच नवोपक्रमाचे मूळ आहे. नवीन अभ्यासक्रमांत कृत्रिम बुद्धिमत्ता, संवर्धित वास्तव, आभासी वास्तव, वापरकर्ता अनुभव रचना, सर्जनशील तंत्रज्ञान आदी आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. उद्योग–शैक्षणिक सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जात आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. कार्यक्रमास आमदार पराग अळवणी, कोमल उल्लाल, गुरुचरण सिंग संधू, अरविंद प्रभू, मोहन वेदपाठक आदी मान्यवर उपस्थित होते.






17,723 वेळा पाहिलं