आता महानगरांमध्ये तीन दिवसांत नवीन वीज जोडणी
राज्यात वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. महावितरणने आपल्या कार्यपद्धतीत क्रांतिकारक बदल करत तंत्रज्ञानस्नेही प्रणाली कार्यान्वित केली आहे. या नवीन प्रणालीमुळे आता राज्यातील महानगरपालिका क्षेत्रांमधील ग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठी महिनोनमहिने वाट पाहावी लागणार नाही, तर केवळ तीन दिवसांच्या आत वीज जोडणी मिळणार असल्याची घोषणा महावितरणने केली आहे.
पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर भर देत महावितरणने ही प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक बनवली आहे. महावितरणने आपल्या अंतर्गत प्रक्रियेचे पूर्णपणे डिजिटल रूपांतर केले आहे. यापूर्वी नवीन कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी, कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी यामध्ये बराच वेळ जात असे. आता नवीन तंत्रज्ञानामुळे, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी वेगाने होईल. ग्राहकाला आपल्या अर्जाची स्थिती मोबाईलवर पाहता येईल. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना नवीन गॅझेट्स आणि ॲप्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यामुळे जागेवरच तांत्रिक चाचणी अहवाल अपलोड करणे शक्य होईल.
सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना राज्यातील सर्व प्रमुख महानगरपालिका क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी महावितरणचे जाळे सक्षम आहे आणि जिथे ‘नेटवर्क’ उभारणीसाठी अतिरिक्त खांब उभे करण्याची गरज नाही, अशा ठिकाणी हा तीन दिवसांचा नियम कडकपणे पाळला जाईल. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले की, ग्राहकांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अचूक अपलोड केल्यास ही प्रक्रिया अधिक वेगवान होईल. जर ग्राहकाची अंतर्गंत वीज मांडणी पूर्ण असेल आणि सुरक्षा अनामत रक्कम भरली असेल, तर तांत्रिक अडचणी नसल्यास तिसऱ्या दिवशी वीज मीटर बसवले जाईल. वीज जोडणीसाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागते किंवा काही वेळा अनधिकृत वसुलीचे प्रकार घडतात. नवीन डिजिटल प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे. ग्राहकाला आता कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. सर्व काही पेपरलेस होणार असल्याने पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.