भारतीय नौदलात एकोणवीस नवीन युद्धनौका दाखल होणार

भारतीय नौदल आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या विस्तार मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. सन २०२६ हे वर्ष नौदलासाठी विस्ताराचे सर्वोच्च वर्ष ठरणार आहे. या एकाच वर्षात तब्बल एकोणवीस नवीन युद्धनौका नौदलात सहभागी करुन घेतल्या जाणार आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये नौदलाने एका पाणबुडीसह चौदा जहाजे आपल्या ताफ्यात घेतली होती, मात्र यावेळचा आकडा त्याहूनही मोठा आहे.

या एकोणवीस जहाजांमध्ये केवळ लढाऊ नौकाच नव्हे, तर तांत्रिक आणि सहाय्यक जहाजांचाही समावेश आहे. प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत तयार करण्यात आलेली ही जहाजे अत्याधुनिक रडार यंत्रणेला गुंगारा देण्याची क्षमता ठेवतात. यातील आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी यांसारखी जहाजे यापूर्वीच चर्चेत आली आहेत. ही जहाजे समुद्राचा तळ मोजण्यासाठी आणि हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी वापरली जातात. खोल समुद्रातील गुप्त माहिती मिळवण्यासाठी याची मोठी मदत होते. समुद्रात बुडालेल्या पाणबुड्या वाचवण्यासाठी किंवा खोल समुद्रातील तांत्रिक कामांसाठी ही जहाजे अत्यंत महत्त्वाची आहेत. पाणबुड्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्यासाठी विशेषतः उथळ पाण्यात काम करणारी जहाजेही ताफ्यात येणार आहेत.

या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व युद्धनौका मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारतातच तयार करण्यात आल्या आहेत. माझगाव डॉक, गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि कोचीन शिपयार्ड यांसारख्या सरकारी आणि काही खाजगी शिपयार्ड्सनी हे मोठे लक्ष्य साध्य करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. पूर्वी एक युद्धनौका तयार करण्यासाठी आठ ते नऊ वर्षे लागत होती. आता प्रगत डिझाइन सॉफ्टवेअर आणि एकात्मिक बांधकाम पद्धतीमुळे हा वेळ सहा वर्षांवर आला आहे. जहाज बांधणीत आता एआयचा वापर केला जात आहे, ज्यामुळे बांधणीत येणारे तांत्रिक अडथळे आधीच समजतात आणि काम वेगाने होते.

हिंदी महासागर क्षेत्रात चीनची वाढती घुसखोरी आणि पाकिस्तानच्या हालचाली पाहता, भारताचा हा नौदल विस्तार अत्यंत महत्त्वाचा आहे. या नवीन नौकांमुळे भारताची ताकद केवळ किनारपट्टीपुरती मर्यादित न राहता, खोल समुद्रातही वर्चस्व गाजवणारी बनेल. भारताची ही वाढती शक्ती संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी महत्त्वाची ठरेल. सन २०२६ मधील हा विस्तार नौदलाच्या २०३५ पर्यंत दोनशे युद्धनौका ताफ्यात घेण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टाचा एक भाग आहे.






19,172 वेळा पाहिलं