
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आणि सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीने प्रचंड बहुमत मिळवत राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.
बिहार विधानसभेच्या एकूण दोनशे त्रेचाळीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएने दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. एनडीएने दोनशेहून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. या विजयात भाजपचा वाटा सर्वाधिक आहे. भाजप एकट्याने नव्वदहून अधिक जागांवर विजय मिळवत बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल देखील ऐंशीहून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणूकीत लोक जनशक्ती पक्ष, हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांसारख्या एनडीएच्या इतर घटक पक्षांनीही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
बिहारच्या मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास दाखवला आहे. लाडकी बहीण योजना यांसारख्या योजनांमुळे महिला मतदारांनी मोठ्या संख्येने एनडीएच्या बाजूने मतदान केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपची मजबूत संघटनात्मक रचना आणि प्रभावी बूथ व्यवस्थापन यांचाही विजयात मोठा वाटा आहे. मागील काही वर्षांत नितीश कुमार यांनी केलेल्या विकासकामांचे फलित एनडीएला मिळाले.
एनडीएच्या या दणदणीत विजयानंतर संपूर्ण देशभरात भाजप आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. या मोठ्या विजयानंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणे निश्चित झाले आहे. एनडीएची ही अभूतपूर्व कामगिरी भाजपला राष्ट्रीय राजकारणात अधिक बळ देणारी ठरली आहे. आता एनडीए सरकार बिहारच्या विकासाला कोणती दिशा देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.