
देशातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यासाठी केंद्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात डिजिटल शेतीवर मोठा भर दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात भारत-विस्तार या विशेष एआय प्लॅटफॉर्मची घोषणा केली. हे टूल केवळ माहिती देणारे साधन नसून, शेतकऱ्यांच्या दैनंदिन प्रश्नांवर तोडगा काढणारा एक डिजिटल सल्लागार म्हणून काम करणार आहे.
भारत-विस्तार हे एक बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन आहे, जे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शेतीविषयक अचूक सल्ला देईल. हे टूल केंद्र सरकारचे शेतीविषयक पोर्टल आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ज्ञानाच्या भांडाराला एआय सिस्टमशी जोडणार आहे. सुरुवातीला हे टूल हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल, परंतु लवकरच ते मराठीसह सर्व प्रादेशिक भाषांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास सक्षम होईल. यामुळे जमिनीचा प्रकार आणि हवामानानुसार कोणते पीक घ्यावे, याची माहिती थेट मोबाईलवर मिळेल. पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कामांसाठी हवामानाचा रिअल-टाइम अंदाज देऊन होणारे नुकसान टाळता येईल. पिकावर पडणाऱ्या रोगाचे छायाचित्र काढून पाठवल्यास, त्यावर कोणते औषध फवारावे आणि त्याचे प्रमाण किती असावे, याचे मार्गदर्शन हे एआय टूल करेल. जवळच्या बाजारपेठांमधील भाव आणि सरकारी योजनांच्या पात्रतेबद्दलची माहिती तात्काळ उपलब्ध होईल. या टूलमुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या निर्णयांमध्ये अचूकता आल्यामुळे शेतीतील जोखीम कमी होईल. यासाठी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी दीडशे कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद केली आहे.
याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पात नारळ, काजू, कोको आणि चंदनाच्या लागवडीसाठी विशेष पॅकेज देण्यात आले आहे. काजू आणि कोकोला जागतिक स्तरावर ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. देशातील दहा दशलक्ष नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी योजना जाहीर करण्यात आली असून, यासाठी तीनशे पन्नास कोटींची तरतूद आहे. पशुपालकांसाठी क्रेडिट-लिंक्ड सबसिडी आणि पाचशे जलाशयांच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय विकासावर भर दिला जाणार आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी एकूण एक पूर्णांक बासष्ट लाख कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भारत – विस्तार आणि शेती – टेक स्टार्टअप्समुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.