एसटीच्या एकशे एकोणचाळीस फेऱ्या रद्द – प्रवाशांना मनस्ताप
पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या रासायनिक टँकरच्या अपघातामुळे मंगळवारपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी बुधवारीही कायम होती. गुरुवारी सकाळी ही वाहतूक कोंडी सोडवण्यात यश मिळाले. मात्र, या वाहतूक कोंडींचा सर्वाधिक परिणाम एसटी महामंडळाच्या सेवांवर झाला. प्रवाशांना तासनतास बसस्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले.
बुधवारी द्रुतगती मार्गावरील परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे विविध आगारांमधून सुटणाऱ्या एकूण एकशे एकोणचाळीस बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सर्वाधिक फटका महागड्या सेवांना बसला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या एकूण त्र्याहत्तर ई-शिवनेरी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर साध्या, निमआराम आणि हिरकणी अशा सहासष्ट इतर बस फेऱ्याही रद्द झाल्या. वाहतूक कोंडीत अडकलेली लाल परीच्या फेऱ्याही रद्द झाल्या. तर द्रुतगती मार्गावर आधीच निघालेल्या महामंडळाच्या एकशे त्रेसष्ट बस प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या. यामध्ये सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या विभागांतील बसेसची संख्या मोठी होती. सातारा विभागातील शेहेचाळीस बस, सोलापूर विभागातील छत्तीस बस, पुणे विभागातील वीस बस, सांगली विभागातील अठरा बस, कोल्हापूर विभागातील तेरा बस, पालघर विभागातील बारा बस, ठाणे विभागातील अकरा बस, मुंबई विभागातील सात बस यांचा समावेश आहे.
प्रचंड उन्हात आणि घाटातील वळणांवर अडकलेल्या बसमध्ये प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना पाणी आणि अन्नासाठी वणवण करावी लागली. बुधवारी उशीरा प्रशासनाने प्रवाशांना खाण्या पिण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्या. पण तोपर्यंत वृद्ध, स्त्रिया, लहान मुलांचे खूप हाल झाले. हा अपघात खंडाळा घाटातील अदालत पॉइंट जवळ झाल्यामुळे पूर्ण मार्ग ठप्प झाला होता. रसायनाची गळती आणि टँकरचा अवजडपणा यामुळे तो हटवण्यास वेळ लागला. सध्या वाहतूक पूर्वपदावर आली असली तरी प्रवासाचा वेळ थोडा वाढला आहे.