नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

नाशिक जिल्हा हा आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले असले, तरी बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. अहवालानुसार, हे क्षेत्र आता अडीच लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. अनुकूल पावसामुळे आणि पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली होती. उत्पादन वाढल्यामुळे बाजारात कांद्याची आवकही प्रचंड प्रमाणात होत आहे. मात्र, जास्त आवक, कमी भाव या बाजारपेठेच्या नियमाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल तेराशे ते अठराशे रुपये इतका दर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मते, एक क्विंटल कांदा पिकवण्यासाठी येणारा खर्च हा या दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. खते, बियाणे, मजुरी, वाहतूक आणि औषध फवारणी यांचा विचार करता, सध्या मिळत असलेला भाव शेतकऱ्यांचा मूळ उत्पादन खर्चही भरून काढण्यास अपुरा पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात नफा उरणे तर दूरच, पण पदरचे पैसे खर्च करण्याची वेळ आली आहे.

 उत्पादन खर्च आणि कमी भाव यांसोबतच हवामान बदल हे शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान ठरले आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि वाढती थंडी यामुळे कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे कांद्याचा दर्जा खालावतो आणि साहजिकच त्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. हवामानातील या लहरीपणामुळे काढणीला आलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. बाजार समितीतील जाणकारांच्या मते, कांद्याचे भाव पडण्यामागे केवळ जादा उत्पादन हे एकमेव कारण नाही, तर सरकारी धोरणे आणि निर्यात मर्यादा यांचाही मोठा वाटा आहे. निर्यात शुल्कातील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेमुळे भारतीय कांद्याला अपेक्षित मागणी मिळत नाहीये. जेव्हा देशांतर्गत बाजारात कांदा मुबलक असतो, तेव्हा निर्यातीसाठी प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तसे होताना दिसत नाही.

नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे केवळ कांदा पिकावर अवलंबून आहेत. मुलांचे शिक्षण, लग्नकार्य आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ते कांदा विक्रीतून येणाऱ्या पैशांवर अवलंबून असतात. मात्र, यंदा झालेल्या दोनशे कोटींच्या नुकसानामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.






3,998 वेळा पाहिलं