
महाराष्ट्रभरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ऑनलाइन भाडेकरार नोंदणी प्रक्रिया मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली आहे. आधार पडताळणी प्रक्रियेत आलेल्या बिघाडामुळे हजारो भाडेकरू आणि घरमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र मुद्रांक आणि नोंदणी विभागामार्फत राबवली जाणारी ऑनलाइन रेंट एग्रीमेंट प्रणाली ही पूर्णपणे आधार आधारित बायोमेट्रिक्सवर अवलंबून असते. मात्र, मागील सात दिवसांपासून ही पडताळणी सेवा विस्कळीत झाली आहे. सुरुवातीला हा बिघाड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून असल्याचे समजले जात होते. मात्र, नोंदणी विभागाने स्पष्ट केले आहे की, हा बिघाड राज्याच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या स्तरावर असलेल्या विंडोज सर्व्हरमधील तांत्रिक त्रुटीमुळे झाला आहे. मुद्रांक विभाग, डीआयटी आणि यूआयडीएआय यांमधील जी माहितीची साखळी असते, ती खंडित झाल्यामुळे आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊ शकत नाही.
ऑनलाइन सेवा बंद झाल्यामुळे भाडेकरार करण्यासाठी आता नागरिकांकडे दोनच पर्याय उरले आहेत. जे काम घरबसल्या किंवा महा-ई-सेवा केंद्रातून होत होते, त्यासाठी आता प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जावे लागत आहे. ऑनलाइन प्रक्रियेत प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नव्हती, मात्र आता नोंदणीसाठी दोन साक्षीदारांसह हजर राहावे लागत आहे, ज्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहेत. केवळ भाडेकरारच नाही, तर या तांत्रिक बिघाडाचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसला आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत नवीन घरांची नोंदणी बिल्डरांच्या कार्यालयातून ऑनलाइन पद्धतीने केली जाते. आधार पडताळणीअभावी ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. दररोज राज्यात सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त भाडेकरारांची नोंदणी होते. ही प्रक्रिया रखडल्यामुळे सरकारच्या मुद्रांक शुल्क महसुलावरही परिणाम झाला आहे.
वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे नागरिक आणि सेवा पुरवठादार संताप व्यक्त करत आहेत. जर आधार पडताळणीत अडथळा आला, तर ईमेल ओटीपी किंवा इतर बायोमेट्रिक पर्यायांचा विचार सरकारने करायला हवा, अशी मागणी केली जात आहे. कोणत्याही तांत्रिक देखभालीसाठी सेवा बंद ठेवताना नागरिकांना आधी कळवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे नियोजन चुकणार नाही. नोंदणी व मुद्रांक विभागाचे अधिकारी या समस्येचे निराकरण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाशी सतत संपर्कात आहेत. विंडोज सर्व्हर दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच ही सेवा पूर्ववत होईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.