ई‑चालानसाठी शासकीय उपकरणे वापरण्याचे आदेश

राज्यभरात वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई करताना आता पोलिसांनी खासगी मोबाईल फोनचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ई‑चालान पाठवण्यासाठी फक्त अधिकृत यंत्रणांचा वापरच करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य वाहतूक शाखेचे अतिरिक्त महासंचालक प्रदीप सलुंखे यांनी दिले आहेत.
या नव्या आदेशामुळे आता कोणताही वाहतूक पोलीस खाजगी मोबाईलवरून वाहन चालकाचा फोटो काढून त्यावर दंड आकारू शकणार नाही. ई‑चालानासाठी केवळ अधिकृतपणे प्रदान केलेल्या कॅमेऱ्यांचा किंवा शासकीय मोबाईल उपकरणांचा वापर करावा लागेल.
या निर्णयाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पारदर्शकता वाढवणे, नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि पोलिसी यंत्रणेत एकसंधता आणणे. खाजगी मोबाईलमधून फोटो काढल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी २०२०, २०२२ आणि २०२४ मध्येही अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी पोलीस कर्मचारी अद्यापही खाजगी मोबाईलचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. यावरूनच वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता पुन्हा स्पष्ट आदेश दिले आहेत. हा निर्णय सामान्य वाहनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. यामुळे मनमानी पद्धतीने चालान लावणे, चुकीचे फोटो वापरणे अथवा गैरसमज टाळण्यास मदत होईल.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या बातम्या या पानाला जरुर भेट द्या.