
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, पाकिस्तान आणि चीन गुप्तपणे अणु चाचण्या करत आहेत. ट्रम्प यांच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या या दाव्याचे चीनने खंडन केले आहे.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे सर्व देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत, तर अमेरिका हा एकमेव देश आहे जो चाचण्या करत नाहीये. इतर देश चाचण्या करत असताना अमेरिकेने चाचण्या थांबवून चालणार नाही. अमेरिकेच्या शस्त्रास्त्र प्रणालीची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी अशा चाचण्या आवश्यक आहेत. रशियाने प्रगत अण्वस्त्र-सक्षम प्रणालींच्या चाचण्या केल्यानंतर, अण्वस्त्रे स्फोटित करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल विचारले असता ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, आम्ही चाचणी करणार आहोत. कारण इतर देश चाचणी करत आहेत आणि इतरही चाचणी करत आहेत. निश्चितच उत्तर कोरिया चाचणी करत आहे. पाकिस्तान चाचणी करत आहे. असे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की इतर देश चाचण्या भूमिगत करत आहेत जिथे लोकांना नेमके काय चालले आहे याची माहिती नसते. यासोबतच ट्रम्प यांनी असाही दावा केला की, अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर जागतिक पटलावर या विषयावर चर्चा रंगली आहे.