
राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण,लक्ष्मी,गणेश या देवतांच्याही मूर्ती आहेत.सन १८५७ च्या बंडानंतर येथे एक बाबा बसायला लागले. पाताळेश्वरच्या शेजारील टेकडीवर ते रहायचे. या बाबांचे बालपण सोलापूरजवळील होनमुर्गी या गावी व्यतीत झाले. त्यांना लोक ‘जंगली महाराज’ असे म्हणत. सन १८९० दरम्यान त्यांचे निधन झाले. भक्तांनी त्या टेकडीवर त्यांचे मंदिर बांधले.
त्यामुळे येथील वर्दळही वाढली आहे. मोठे प्रांगण असलेल्या पाताळेश्वर लेण्याच्या या प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांवर उभा आहे. त्याच्या आत आणखी एक वर्तुळ आहे. तेथे नंदी आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे.
गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. गर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवरील शिल्पे पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यातील एक शिल्प श्री शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक शिलालेख आहे. पेशवे काळात या मंदिराला दक्षिणा दिल्याचे उल्लेख आढळतात. या भागात आता ‘संभाजी उद्यान’ तयार करण्यात आले आहे. येथे भाविकांसह निसर्गप्रेमी पर्यटकांची पावले आपोआपच वळू लागली आहेत.