पेंच व्याघ्र प्रकल्प

पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या सीमेवरील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याचे मोठे क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेशातील ‘छिंदवाडा’ जिल्ह्याचा भाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. या उद्यानाचे नाव ‘पेंच’ या नदीवरून पडले आहे. या नदीचा प्रवास उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याशी हा प्रकल्प संलग्न आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची विपुलता आहे. या द्यानाचा उल्लेख अनेकदा पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणून केला जातो. ‘पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान’ असेही या उद्यानाला म्हणतात. सन 1977 मध्ये या क्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. सन 1983 मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर सन 1992 मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ अंतर्गत व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. नोंदीनुसार, या राष्ट्रीय उद्यानाला सन 1999 मध्ये भारतातील 25 व्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला.

या व्याघ्र पकल्पात 210 हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांना पर्यटक भेट देऊ शकतात. ज्यामध्ये अनेक स्थलांतरित प्रजातींचा समावेश आहे. याच प्रकल्पाने रुडयार्ड किपलिंग याला ‘द जंगल बुक’ लिहिण्यास प्रोत्साहित केले, ज्यामध्ये ‘मोगली’ हा मुख्य पात्र होता. अनेक साहसी पर्यटकांना रोमांचित करणारे हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. पेंच नदी आलोंडून ‘तोतलाडोह’ येथे बांधलेल्या ‘मेघदूत’ धरणाने ७२ चौकिमीचा एक मोठा जलसाठा तयार केला आहे. या जलसाठ्याचा ५४ चौकिमीचा भाग मध्यप्रदेश आणि उर्वरित महाराष्ट्र लगतच्या राज्यात येतो. बंगाली वाघ, सांबर, लांडगे, आळशी अस्वल, भारतीय बिबट्या, चितळ, गवे,नीलगाय, चौसिंग असे अनेक प्राणी येथे पहायला मिळतात.

वनस्पतीमध्ये सागवानाच्या वेगवेगळ्या प्रजाती, बांबूची वने तसेच गवताळ कुरणे ही जास्त प्रमाणात आढळतात. पर्यावरणीयदृष्ट्या पेंच हे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने असलेले ठिकाण आहे. येथे जायचे असल्यास विमान मार्गाने गेलात तर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पेंचला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळ पेंचपासून अंदाजे 105 कि.मी. अंतरावर आहे. रेल्वेने गेल्यास पेंचला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे. पेंचपासून ते 105 किमी अंतरावर आहे. हे भारतातील सर्व प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे.

रस्त्याने गेल्यास नागपूरातून ते राज्य परिवहन बसगाड्यांनी चांगले जोडले आहे. येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. अलीकडे शासनामार्फत पर्यटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. आता वन विभागाने ‘पेंच’ नदीतून पर्यटकांसाठी बोट सफारी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. ही सफर पेंच नदीतून केली जाणार आहे. यामुळे पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी पर्यटकांना दिसणार आहेत.






23,676 वेळा पाहिलं