फणसाड अभयारण्य

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘मुरुड’ गावाच्या अलीकडे ‘फणसाड वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील प्राणी-पक्षीप्रेमी येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर येथे भेट देत असतात.

मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर हे अभयारण्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे हे क्षेत्र म्हणजे मुरुड जंजिरा संस्थानाचे राखीव शिकार क्षेत्र होते. संस्थानाचे नवाब सिद्दी यांच्या मालकीचे हे शिकारस्थळ होते. महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.

येथे शुष्क पानगळीची वने, सदाहरित वने, मिश्र सदाहरित वने व नदीकाठची वने अशी वैविध्यपूर्ण झाडे आहेत. 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात.

साग व निलगिरीची वने यासह दुर्मिळ व औषधी वृक्ष आढळतात. यामध्ये प्रामुख्याने एैन, किंजळ, जांभूळ, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक ‘नरक्या’ वनस्पती आढळते. यासह उक्षी, सर्पगंधा, कुरडु मोठ्या प्रमाणात आहेत. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेलींचा समावेश आहे. जगातील सर्वांत लांबीची ‘गारंबीची वेल’ हे येथील वैशिष्ट्य आहे.

येथे आढळणाऱ्या वन्य प्राण्यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर, बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले ‘शेकरु’ हमखास दृष्टीस पडते. नाग, फुरसे, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, तस्कर यासारखे अनेक बिनविषारी साप येथे आढळतात.
ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे इत्यादी शिकारी पक्षी व सातभाई, बुलबुल, रातवा, रानकोंबड्या, धनेश, कोतवाल यासह वेडाराघू, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, हरीयाल, कोकीळ यासारखे गाणारे व रंगीबेरंगी पक्षी येथे पहायला मिळतात. पर्यटकांचे खास आकर्षण असलेला बिबट्या येथे अगदी सहजपणे पहावयास मिळतो. याव्यतिरीक्तही येथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.






535 वेळा पाहिलं