राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार

राज्यातील ज्योतिर्लिंग स्थळांना वर्षभर मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. हे लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ आणि श्री क्षेत्र घृष्णेश्वर या तीनही ज्योतिर्लिंग क्षेत्रांचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंदिर परिसरातील सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करण्यात यावे, तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यान्वित करावी, असेही त्यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थान येथे आयोजित बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्योतिर्लिंग स्थळांवर येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर्शन रांगा, प्रतीक्षा कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निवास व्यवस्था, अंतर्गत रस्ते, परिसर स्वच्छता, माहिती फलक, पर्यटक स्वागत कक्ष, पार्किंग, तिकीट कक्ष, आरोग्य सुविधा आणि उपहारगृहे अशा सेवा-सुविधांचे सुयोग्य नियोजन करावे. यात्रेचा आणि उत्सवाचा काळ लक्षात घेऊन या सुविधा भाविकांसाठी सहज उपलब्ध होतील याची खात्री करून घ्यावी. तसेच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहभागातून ही कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा व्यवस्थेबाबत फडणवीस यांनी सांगितले की, ज्योतिर्लिंग स्थळांवर काटेकोर सुरक्षा व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षाप्रणाली विकसित करावी, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तात्काळ मदत मिळू शकेल. मंदिर व्यवस्थापनासाठी कठोर नियमावली लागू करण्यात यावी. पर्यटन विभागाने पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मिती लक्षात घेऊन प्रस्तावित कामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत राज्यातील नियुक्त अधिकाऱ्यांनी विविध विकास आराखड्यांचे सादरीकरण केले. श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि कुंभमेळा 2027 साठीचा आराखडा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सादर केला. श्री क्षेत्र औंढा नागनाथचा आराखडा वित्त विभागाच्या प्रधान सचिव ऋचा बागला यांनी तर श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा विकास आराखडा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी यांनी सादर केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळाल्यानंतर आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.






17,351 वेळा पाहिलं