पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा

नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा म्हणजे विलक्षण आकर्षण असते. रामनवमीला ही यात्रा निघत असते. ती पाहण्यासाठी विदर्भासह शेजारील राज्यांतूनही नागरिक येत असतात. यावर्षी रामनवमीला १७ एप्रिल रोजी मंदिरातून शोभायात्रा दुपारी ४ वाजता निघणार आहे. या शोभायात्रेत १०८ मंगलकलश डोक्यावर घेऊन चालणाऱ्या कन्या दिसतील.

पौराणिक प्रसंग तसेच सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, शहनाई वादक, ढोल-ताशा व ध्वजधारी पथक, गांधीबाग स्केटिंग क्लब व शंखनाद करणारे पाचशे सदस्य आदींचा समावेश राहील. शोभायात्रेतील मुख्य रथावरील बॅकग्राऊंड हे अयोध्येतील राम मंदिराचे असेल.

शोभायात्रेचे हे ५८वे वर्ष आहे. या सोहळ्यात शंखनाद, तांडव नृत्यासह चित्ररथांचा समावेश असणार आहे, अशी माहिती पुनित पोद्दार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. ही शोभायात्रा पोद्दारेश्वर राम मंदिर, इतवारी शहीद चौक, महाल, कॉटन मार्केट, सीताबर्डी असा राहील. जागोजागी शोभायात्रेचे विविध संस्था, संघटनांद्वारे स्वयंस्फूर्तीने स्वागत होणार आहे. महाप्रसादाचे वितरण होईल.