पोलीस पंचनामे आता डिजीटल होणार
महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे तपासात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी ई-साक्ष या अत्याधुनिक मोबाइल ॲपचा वापर सुरू केला आहे. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर हा एक ऐतिहासिक बदल मानला जात आहे. आता गुन्ह्याचा पंचनामा केवळ कागदावर मर्यादित न राहता तो डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड केला जाणार आहे. यासाठी ई-साक्ष या ॲपचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
ई-साक्ष थेट गुन्हेगारी न्याय प्रणालीशी जोडलेले आहे. तपासी अधिकाऱ्याला घटनास्थळी गेल्यावर या ॲपद्वारे गुन्ह्याच्या ठिकाणची शोधमोहीम आणि जप्तीची प्रक्रिया थेट व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करता येईल. प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्या ठिकाणचे अक्षांश-रेखांश आणि अचूक वेळ आपोआप नोंदवली जाते, ज्यामुळे पुराव्यांशी छेडछाड करणे अशक्य होते. पंचनामा पूर्ण झाल्यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला स्वतःचा सेल्फी अपलोड करावा लागतो, ज्यामुळे त्या ठिकाणी अधिकृत अधिकारी उपस्थित होता हे सिद्ध होते. पूर्वी अनेकदा न्यायालयात तांत्रिक त्रुटींमुळे आरोपी सुटले जायचे. मात्र, ई-साक्ष ॲपमुळे पुराव्यांची साखळी अधिक भक्कम होणार आहे. ॲपवर अपलोड झालेला डेटा कायमस्वरूपी डिजिटल स्टोरेजमध्ये साठवला जातो, म्हणजेच तो कोणीही बदलू किंवा नष्ट करू शकत नाही. प्रत्येक डिजिटल फाईलचा एक विशिष्ट संकेतांक तयार होतो. जर फाईलशी थोडी जरी छेडछाड झाली, तर हा संकेतांक बदलतो, यामुळे न्यायालयात पुराव्याची सत्यता पडताळणे सोपे जाईल. पोलीस तपासात जमा केलेले हे डिजिटल पुरावे थेट न्यायालयाच्या पोर्टलवर उपलब्ध होतात, ज्यामुळे कागदोपत्री प्रवासात होणारा विलंब टाळता येतो.
नवीन कायद्यानुसार, ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे, अशा ठिकाणी फॉरेन्सिक तपासणी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आता बंधनकारक आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या येऊ शकते. अशा वेळी, ॲपमध्ये ऑफलाइन रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात आली आहे. अधिकारी घटनास्थळी रेकॉर्डिंग करून नंतर पोलीस स्टेशनला आल्यावर इंटरनेट उपलब्ध होताच तो डेटा क्लाउडवर अपलोड करू शकतात.