
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालल्याचे स्पष्ट करणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ‘ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन संस्था’ या संस्थेने जानेवारी ते जून २०२५ या सहामाही कालावधीसाठी एक अभ्यास केला असून त्यामधून मुंबईतील अनेक भागांतील प्रदूषणाची पातळी धोक्याची आहे, हे समोर आले आहे.
या अभ्यासानुसार, मुंबईतील देवनार, सायन, कांदिवली आणि बांद्रा-कुर्ला संकुल या भागांमध्ये हवेतील सूक्ष्म धूलिकणचे प्रमाण केंद्र सरकारच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, ही प्रदूषणाची पातळी चेन्नई, कोलकाता, पुदुच्चेरी आणि विजयवाडा या किनारपट्टीवरील महानगरांपेक्षाही अधिक असल्याचे निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे.
सामान्यतः समुद्रकिनाऱ्यालगतची शहरे प्रदूषणाच्या तुलनेत तुलनेने सुरक्षित मानली जातात, कारण समुद्राच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवेचा नैसर्गिक शुद्धीकरण होतो. मात्र, मुंबईत याउलट चित्र दिसून आले आहे. वाढते शहरीकरण, वाहनांची अमर्याद संख्या, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे, औद्योगिक घाण आणि कचऱ्याची उघडपणे होणारी जाळपटक ही सर्व कारणे या प्रदूषणवाढीस कारणीभूत ठरत आहेत.
क्रिया संस्थेच्या अभ्यासानुसार देशभरातील दोनशे एकोणचाळीस शहरांपैकी एकशे बावीस शहरांमध्ये पी.एम. दोन. पाच चे प्रमाण राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, एकही शहर जागतिक आरोग्य संघटनेच्या पाच मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर या अत्यंत कठोर निकषांमध्ये बसत नाही. मुंबई यामध्ये अपवाद नाहीच, उलट ती अनेक मानकांमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखली जात आहे. मुंबईतील हवेतील प्रदूषण केवळ सूक्ष्म धूलिकणांपुरते मर्यादित नाही, तर पी.एम. म्हणजेच मोठ्या कणांचे प्रदूषण देखील चिंतेचा विषय ठरत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत दररोज पी.एम. दहाचे प्रमाण राष्ट्रीय मर्यादेपेक्षा अधिक नोंदवले गेले. यामध्ये देवनार, कुर्ला, चकला, मलाड पश्चिम आणि बांद्रा-कुर्ला संकुल हे भाग सर्वाधिक प्रभावित होते.
प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांपासून ते हृदयविकार, फुफ्फुसांचे विकार, दम्याचे झटके आणि लहान मुलांमध्ये वाढती अस्वस्थता अशा गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विशेषतः वृद्ध आणि बालकांचे आरोग्य अधिक धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर क्रिया संस्थेने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना काही महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. त्यामध्ये प्रदूषण कमी करणाऱ्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, बांधकामांवर नियंत्रण, सार्वजनिक वाहतुकीचा प्रसार, हरित क्षेत्र वाढविणे, धूळ नियंत्रणासाठी कठोर नियम लागू करणे, आणि नागरिकांना पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक करणे यांचा समावेश आहे.
मुंबईसारख्या आधुनिक शहरात हवेची अवस्था इतकी गंभीर असणे ही धोक्याची घंटा असून तातडीने उपाययोजना न केल्यास ही स्थिती आणखी बिघडू शकते. प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीही स्वच्छतेकडे आणि पर्यावरणाच्या रक्षणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.