लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये सकारात्मक बदल
राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी करताना येत असलेल्या अडचणी पाहून या वेबसाईटमध्ये काही सकारात्मक बदल केला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आता वेबसाईटमध्ये बदल होत असल्यामुळे ई-केवायसीसाठी फारसा वेळ लागत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य केले जाते.
याविषयी माहिती देताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, `या योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत. ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशा महिलांसाठी वेबसाईटवर काही सकारात्मक बदल केले जाणार आहेत. त्यामुळे आता महिलांना अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही व कोणतीही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही.`
१८ नोव्हेंबरपर्यंत करा ई-केवायसी :
गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांमध्ये ई-केवायसी करण्याची लगबग सुरू आहे. लाडक्या बहिणींचा १६ वा हप्ता खात्यावर जमा होण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. पण आता बहिणींनो, तुम्ही येत्या १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करू शकता.