मुंबईतील पवई तलाव

पवई तलाव हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी सर्वात प्रसिद्ध तलाव असून मुंबईतील एक नितांतसुंदर ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी लहानसे सुंदर उद्यान आहे. येथे उडणारे कारंजे पाहणाऱ्यांच्या मनास आनंद देणारे आहेत. या तलावाचे क्षेत्रफळ २.१ चौरस किमी आहे. त्याची खोली ३ ते १२ मीटर आहे.
या तलावावर सरकारने बसण्यासाठी बांधकाम केले आहे. चालण्यासाठी पदपथाची सोय केली आहे. पूर्वी येथे ‘पवई’ नावाचे गाव होते. गावातील झोपड्या हलवून तिथे कृत्रिम तलाव बांधण्यात आला. हळूहळू सभोवतालच्या परिसराला त्याच तलावाचे नाव लाभले. ‘मिठी’ नदी आणि ‘विहार’ सरोवराला लागूनच पवई तलाव आहे.

पवई गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मिठी नदीच्या प्रवाहात दोन धरणे बांधण्यात आली. डोंगरावरून वाहत येणारे पावसाचे पाणी साठवून दुष्काळी काळात मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी या धरणाची निर्मिती करावी, असा प्रस्ताव सन १८८९ मध्ये मांडण्यात आला होता. कालांतराने या तलावात सांडपाणी, झाडे, फुले, कचरा आणि मोठ्या प्रमाणात वाहून आणलेला गाळ साचला गेल्याने पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर बंदी घातली गेली. त्यानंतर मासेमारीसाठी या तलावाचा वापर केला जात असे.

सध्या ज्या जागेवर तलाव आहे, ती जागा तलाव बांधण्यापूर्वी डॉ. स्कॉट यांना वार्षिक भाडेपट्टीवर दिली होती. स्कॉट यांच्या मृत्यूनंतर ती जागा सरकारने आपल्या ताब्यात घेतली. सन १८२६ मध्ये ती पुन्हा एकदा फ्रामजी कावसजी यांना भाडेपट्टीवर दिली. त्यानंतर सन १८९१ मध्ये तिथे तलाव बांधण्यात आला. या तलावाला फ्रामजी कावसजी यांचं नाव दिले गेले. आयआयटी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग (निटी) आणि हिरानंदानी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण इमारती लक्ष वेधून घेतात. रात्रीच्या वेळी तलावाच्या काठावरुन दिसणारा सभोवतालचा प्रकाश फारच सुंदर दिसतो.

लार्सन अँड टुबरो कंपनीकडून गाडी वळली की पवई परिसराला सुरुवात होते. काहीसे पुढे गेल्यावर मध्येच हा तलाव दिसतो. तलावाला एका बाजूने संपूर्ण तटबंदी बांधण्यात आली असून तिथे बसण्याची, फिरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तिथे चालण्यासाठी आलेली कित्येक मंडळी दिसतात. आजूबाजूला लहान-मोठी शिल्पे बांधली आहेत. शांत तलाव आणि दूरवर पसरलेला आसपासचा परिसर नयनरम्य आहे. तलावावर नौकानयनची व्यवस्था आहे. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत; मात्र मगरींचे वास्तव्य असल्याने पाण्यात उतरण्यास प्रतिबंध आहे. महानगरपालिकेचा कर्मचारी येथे तैनात केलेला असतो. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईचे सौंदर्य वाढविण्यात हा तलाव मोलाची भूमिका बजावतो.






23,002 वेळा पाहिलं