अनेक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्य निवडणूक आयोगावर ताण

महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाच वेळी निवडणुका घेणं, ही राज्यातील गेल्या तीस वर्षातील पहिलीच वेळ आहे. तीन – चार महिन्यांच्या अल्पकाळात या निवडणुका घेणं, मोठं आव्हान ठरले आहे. मतदान यंत्र, कर्मचाऱ्यांची कमतरता, मतदार यादी, संभाव्य दुबारचे आव्हान, अनेक वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमुळे राजकीय स्पर्धांमध्ये लागलेली स्पर्धा, यातून राज्य निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यात आल्याचं मत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.

कमी कालावधीत निवडणुका घेताना आयोगावरील ताण वाढला आहे. आमच्याकडे केवळ साठ हजार मतदान यंत्र उपलब्ध होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तर इतर महापालिकांच्या निवडणुकांसाठी, मध्य प्रदेशमधून दीड ते पावणे दोन लाख मतदान यंत्र आणावी लागली. दुबार मतदार आचारसंहितेच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर होणारे आरोप हे निराधार आहेत. आयोग पूर्णपणे निपक्षपातीपणे काम करत आहे. संभाव दुबार मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यावर त्याला संबंधित मतदान केंद्रावर, मतदान करण्याची मुभा देण्यात येईल. पिंपरी चिंचवडमध्ये तीस टक्के दुबार मतदार आढळून आले आहेत. घरोघरी जाऊन मतदारांची खातर जमा करण्यात आल्यानंतर, प्रत्येक महापालिकांमध्ये आधी जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य दुबार मतदारांनी साधारण पाच ते दहा टक्के दुबार मतदार आढळून आले आहेत. मुंबईसह इतर महापालिकांनी संभाव दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी, स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली आहे. मतदार याद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आम्ही घेतो, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही. दुबार मतदार आणि संभाव दुबार मतदार यात फरक असतो. याद्यांमधील संभाव दुबार मतदाराचा शोध घेण्यासाठी आयोगाने सर्व महापालिकांना आदेश दिले आहेत, आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

शहरी भागातील मतदानाची कमी टक्केवारी ही चिंतेची बाब राहिली आहे. जिल्हा परिषदेमध्ये चांगले मतदान होते. मुंबईसारख्या महानगरात मतदान टक्का वाढवणे, आता महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी आयोग जनजागृती आणि विविध मार्गाने प्रयत्न करत आहे. मतदान वाढवण्यासाठी थीम साँग, मतदानाची शपथ, पथनाट्य असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. कर मतदान, सांगते संविधान ही टॅगलाईन लोकप्रिय झाली आहे. मतदान केंद्रावर मतदारांना जास्त वेळ रांगेत उभे राहावं लागू नये यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती स्त्रिया यांना मतदानासाठी वेगळी रांग असेल. तसेच त्यांचे वाहन मतदान केंद्रापर्यंत अगदी शंभर मीटरपर्यंत जवळ नेण्यास परवानगी असेल. याशिवाय मताधिकार ॲप विकसित करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून मतदारांना आपले मतदान केंद्र दिसणार आहे. तसेच पोर्टलवरील मतदान केंद्र शोधता येईल.






14,860 वेळा पाहिलं