पुण्यातील संस्थेच्या पर्यावरणीय प्रयत्नांना जागतिक मान्यता
हवामान बदल, तापमानवाढ आणि पर्यावरणीय हानी या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जगभरातील देश एकत्र आले आहेत. याच पार्श्वभूमीवर होणाऱ्या आगामी ‘सीओपी-तीस’ या जागतिक हवामान परिषदेत पुण्यातील ‘बाईफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची चर्चा होणार आहे. ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी गेल्या सहा दशकांपासून कार्यरत असलेल्या या संस्थेच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल मिळाली आहे.
या परिषदेत यंदा “जागतिक हवामान न्याय आणि स्थानिक कृती” हा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच हवामान बदलाच्या लढ्यात स्थानिक पातळीवरील उपाययोजना आणि लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, यावर जगभरातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. पुण्यातील संस्थेने ग्रामीण भारतातील शेतकरी, महिला गट आणि ग्रामसंस्था यांच्या माध्यमातून हवामानपूरक विकासाचे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत, जे आता जागतिक मंचावर सादर होणार आहेत.
बाईफ संस्थेने गेल्या अनेक वर्षांत पाणी व्यवस्थापन, मृदा संवर्धन, अक्षय ऊर्जा, सेंद्रिय शेती, वृक्षलागवड आणि परिपूर्ण अर्थव्यवस्था यांसारख्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या आहेत. या माध्यमातून केवळ पर्यावरण संरक्षण नव्हे, तर ग्रामीण भागातील रोजगार आणि उत्पन्नवाढीसही चालना मिळाली आहे. त्यामुळे या उपक्रमांना हवामान बदलाच्या अनुकूलतेसाठी आदर्श नमुना मानले जात आहे.
या परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारत काकडे सहभागी होणार असून, ते भारतातील स्थानिक स्तरावरील हवामान कृतीचे अनुभव जागतिक प्रतिनिधींना मांडतील. त्यांनी सांगितले की, “हवामान बदलाशी लढा हा केवळ धोरणांचा विषय नाही; तर तो शेतकरी, ग्रामसंघ आणि स्थानिक समाज यांच्या एकत्र प्रयत्नांचा परिणाम असावा.” त्यांच्या मते, स्थानिक कृती आणि जागतिक दृष्टी या दोन गोष्टींचा समन्वय साधल्यास खऱ्या अर्थाने पर्यावरण न्याय मिळू शकतो.
या उपक्रमामुळे पुणे आणि महाराष्ट्रातील संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहे. हवामान बदलाच्या विरोधातील लढ्यात भारताचा वाटा वाढत असून, ग्रामीण भागातील प्रयत्नही जागतिक चर्चेत स्थान मिळवत आहेत. त्यामुळे ‘सीओपी- तीस, परिषदेत भारताचे स्थान आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.