कुंभमेळ्यासाठी पुणे विद्यापीठ – पोलिसांचा विशेष उपक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाशिक येथे होणाऱ्या २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणाऱ्या आणि प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दोन शैक्षणिक क्रेडिट्स दिले जाणार आहेत. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभागी होतात. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासते. ही गरज ओळखून आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव मिळावा या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कुंभमेळ्यातील सहभागाला शैक्षणिक मूल्यांकनाशी जोडले आहे.
नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय विशेषतः लागू असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्याला महत्त्व देण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून कुंभमेळ्यातील कामासाठी विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट्स मिळतील. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची या कामासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये एनसीसी आणि एनएसएसमधील विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग असेल. नाशिक पोलिसांनी पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्याचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना केवळ स्वयंसेवक म्हणून उभे केले जाणार नाही, तर त्यांना विविध तांत्रिक आणि व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या दिल्या जातील.
घाटांवर आणि मुख्य रस्त्यांवर होणारी गर्दी नियंत्रित करणे, शहरांतर्गत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना मदत करणे, चेंगराचेंगरी किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पुरवणे, भाविकांना रस्ते, राहण्याची सोय आणि आरोग्य सुविधांची माहिती देणे, सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात मदत करणे आणि वैद्यकीय मदत केंद्रांवर सहाय्य करणे, या जबाबादाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येतील. हे काम धोकादायक किंवा गुंतागुंतीचे असू शकते, हे लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी स्पष्ट केल्यानुसार, या शैक्षणिक वर्षापासूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन वेळेतच पोलीस ठाण्यांमध्ये किंवा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक व्यवस्थापन तंत्रांचाही वापर केला जाणार आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन आणि शिस्तीचा अनुभव मिळेल. या कार्यामुळे मिळणारे दोन क्रेडिट्स त्यांच्या पदवीच्या अंतिम निकालात महत्त्वाचे ठरतील. पोलीस प्रशासन आणि विद्यापीठाकडून मिळणारे प्रमाणपत्र भविष्यात नोकरीच्या ठिकाणी विशेषतः पोलीस किंवा प्रशासकीय सेवांमध्ये फायदेशीर ठरेल.