पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची मोठी विक्रमी कमाई

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून थिएटर्समध्ये ‘हाऊसफुल’चे फलक झळकू लागले आहेत.अभिनेता सिद्धार्थ बोडके याने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि प्रेरणेचा मानबिंदू असलेले महाराज आजच्या काळात अवतरतात आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढा देतात.अशी या चित्रपटाची प्रभावी कथा आहे.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ने पहिल्याच दिवशी एकोणीस लाख रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी हा आकडा चौतीस लाखांपर्यंत पोहोचला. अशा प्रकारे केवळ दोन दिवसांत चित्रपटाने त्रेपन्न लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कमाईत आणखी वाढ झाली आहे.चित्रपटात सिद्धार्थ बोडकेसोबत विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, सयाजी शिंदे, तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या भूमिका पाहायला मिळतात. कथा आणि पटकथा स्वतः महेश मांजरेकर यांनी लिहिली असून संवाद सिद्धार्थ साळवी यांचे आहेत.

महेश मांजरेकर म्हणतात, “शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयावर बोलणं आणि तो समाजासमोर मांडणं ही काळाची गरज आहे. आजच्या काळातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून महाराज किती संतप्त होतील, हे प्रेक्षकांना या चित्रपटातून दिसेल. हा प्रत्येक मराठी माणसाचा चित्रपट आहे.” चित्रपटाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील जनतेला तो पाहण्याचं आवाहन केलं आहे. दमदार विषय, ऐतिहासिक संदर्भ आणि आधुनिक वास्तव यांचा संगम असलेल्या या चित्रपटाची ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे ही कमाई मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सिद्धार्थ बोडके यांच्या अभिनयाचं आणि चित्रपटातील संवादांचं विशेष कौतुक केलं आहे. आयएमडीबीवर सध्या या चित्रपटाला दहा गुणांपैकी सात पूर्णांक आठ रेटिंग मिळालं असून गूगलवर अठ्याऐंशी टक्के प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.






24,691 वेळा पाहिलं