राज्यात रब्बी हंगामाची उशिराने सुरुवात – शेतकरी चिंतेत

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात रब्बी हंगामाची सुरुवात लांबली आहे. यामुळे पेरणीला उशीर होत आहे. काही भागात जमिनीतील ओलावा जास्त असल्याने आणि वाफसा परिस्थिती नसल्याने पेरणी करणे कठीण झाले आहे. तर काही ठिकाणी अद्याप खरीप पिकांच्या कापणीचे काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

राज्यात रब्बी पिकांसाठी अंदाजित एकूण पेरणीक्षेत्र सत्तावन्न लाख ऐशी हजार चारशे सतरा हेक्टर आहे. मात्र, २८ ऑक्टोबरपर्यंत या पेरणीक्षेत्रापैकी फक्त पस्तीस हजार हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. ही पेरणी अंदाजित क्षेत्राच्या तुलनेत अतिशय कमी आहे. याच कालावधीत मागील वर्षी सुमारे तीस पूर्णांक त्रेपन्न लाख हेक्टरवर पेरणी झालेली होती.  त्या तुलनेत यंदा मोठी घसरण झाली आहे.

सध्याची जमिनीची स्थिती पेरणीसाठी योग्य नाही. हवामान तज्ज्ञांनुसार, सहा ते आठ नोव्हेंबर नंतर हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ज्वारी आणि इतर रब्बी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर होते. या भागात पेरणी खूप उशिरा झाली आहे. तर काही ठिकाणी पेरणी अजून सुरुच झालेली नाही. वेळेवर पेरणी न झाल्यामुळे पिकं योग्य वेळेत वाढू शकत नाहीत, तसेच उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकट ओढवू शकते. यापूर्वी खरीप हंगामात नुकसान झालेले आहे आणि आता रब्बी हंगामालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

 सप्टेंबर महिन्यात पंधरा ते वीस दिवस सलग पाऊस झाल्यामुळे अनेक भागांतील जमिनीची पाणी धारण क्षमता संपली आहे आणि पाणी मुरण्यास अडथळा येत आहे. दिवाळीनंतर अवकाळी पाऊस झाल्याने अनेक खरीप पिकांची कापणी आणि मळणीची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. जमिनीतील जास्त ओलाव्यामुळे पेरणीसाठी आवश्यक असलेली शेतातील पाणी मुरून जमीन पेरणीसाठी योग्य होण्याची स्थिती निर्माण झालेली नाही. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी आवश्यक असलेली थंडी हवामानामध्ये नसल्यानेही पेरणीला उशीर होत आहे. 

या परिस्थितीचा परिणाम शेती कामांवर झाला आहे. पेरणी उशिरा होत असल्याने शेतीची कामे लांबणीवर पडत आहेत. शेतात असलेला पिकांचा माल भिजण्याची आणि खराब होण्याची भीती आहे. खरिपातील नुकसानीनंतर आता रब्बी हंगामावरही संकट आल्याने शेतकरी चिंतेत आहेत आणि मदतीची अपेक्षा करत आहेत. 






12,378 वेळा पाहिलं