गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा

यंदाच्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, वलसाड येथून कोकणात जाण्यासाठी दोनशे बासष्ट विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या एकशे बाणव्व आणि पश्चिम रेल्वेच्या सत्तर विशेष गाड्यांचा समावेश आहे.

या विशेष गाड्या रत्नागिरी, सावंतवाडी, कुडाळ, चिपळूण, मडगाव या ठिकाणी धावणार असून, भाविकांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या गणपती आगमनापूर्वी आणि विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठीसुद्धा चालवण्यात येणार आहेत.

या गाड्यांचे आरक्षण चोवीस जुलैपासून सुरू होणार आहे. सर्वसामान्य संगणकीकृत तिकीट आरक्षण केंद्रांवर तसेच ऑनलाईन प्रणालीवरही बुकिंग करता येणार आहे. याशिवाय, अनारक्षित प्रवाशांसाठी यूटीएस प्रणालीच्या माध्यमातून मोबाईलवर तिकिटे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या काळात अनावश्यक धावपळ टाळण्यासाठी वेळेपूर्वीच आरक्षण करून ठेवावे. प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रेल्वे वेळापत्रकाची माहिती आधीच तपासावी, तसेच स्थानकावर वेळेत पोहोचून प्रवास नियमांचे पालन करावे.

गणेशोत्सव कोकणातील लोकांसाठी विशेष भावनिक महत्त्वाचा असून, या काळात लाखो भाविक आपल्या मूळगावी जातात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने ही विशेष वाहतूक सेवा सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई–कोकण प्रवास आता अधिक सुकर होणार असून, भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी निर्धास्तपणे गावाकडे जाता येणार आहे.






254 वेळा पाहिलं