
नाशिक जिल्हयात चाळीसगाव तालुक्याच्या सातमाळ डोंगररांगेत ‘राजदेहेर’ उर्फ़ ‘ढेरी’ हा किल्ला आहे. हा गड दुर्गम आहे. दोन डोंगरावर वसलेला हा किल्ला आहे. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी डोंगरांमधील घळीतून जावे लागते. किल्ल्यावर चालून येणारा शत्रू मार्यागच्या टप्प्यात राहील, अशी या गडाची योजना आहे. या पुरातन किल्ल्यावर आजही पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. ‘पाटणे’ या राजधानी जवळच हा किल्ला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या महत्वाचा असावा. पुढे यादवांनी हा किल्ला ताब्यात घेतला. यादवानंतर अल्लाऊद्दीन खिलजीकडे व त्यानंतर फारुकींकडे हा किल्ला होता. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश आहे.
दोन डोंगरामधील घळीतील खडकांमध्ये पायऱ्यांचा अरुंद मार्ग खोदून भौगोलिक रचनेचा उपयोग किल्ला बांधताना केलेला आहे. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर जवळच व्यालमुख असलेले दोन भग्न स्तंभ दिसतात. प्रवेशद्वाराच्या काहीसे वर दगडात खोदलेले लेणे आहे. त्याच्या बाजूला एक गुहा व पाण्याचे टाक आहे. येथून संपूर्ण किल्ला दिसतो. येथून पुन्हा प्रवेशद्वारापाशी येऊन गडफेरी सुरु केल्यावर पाण्याचे दोनखांबी टाक मिळते.
गडाच्या माचीवर साचपाण्याचा तलाव आहे. बाजूला नंदी व पिंड उघड्यावर आहेत. तलावावरुन पुढे गेल्यावर दगडात खोदलेल्या पादूका दिसतात. माचीवर निमूळत्या टोकापर्यंत गेल्यावर आजूबाजूचा विस्तृत प्रदेश व गाव पाहता येते. बालेकिल्ल्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. मनमाड भुसावळ रेल्वेमार्गावर नांदगाव स्थानकावर उतरुन राजदेहेरवाडीला जाण्यासाठी जीप मिळतात. ‘राजदेहेरवाडी’ पासून २ किमी. अंतरावर महादेव मंदिर आहे. या मंदिराजवळून किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे.