पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

महाराष्ट्रातील पुणे शहरात कात्रज येथे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे. पुणे महानगरपालिकेने पर्वती पायथ्याजवळ सन १९५३ मध्ये ‘पेशवे पार्क’ची स्थापना केली. येथे पूर्वी पेशव्यांचे स्वत:चे प्राणिसंग्रहालय होते. अवघ्या ७ एकर जागेत बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये पर्यटकांना प्राणी पाहता येत असत. केवळ लोकांचे मनोरंजन हा याचा एकमात्र उद्देश होता.
सन १९९२ मध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची स्थापना झाली. त्यानंतर प्राणिसंग्रहालयांची स्थिती पूर्णपणे बदलून शास्त्रीय पद्धतीने वन्य प्राणी संवर्धन होऊ लागले. सन १९९६ मध्ये कात्रज येथील १३० एकर जागेत प्राणी प्रजोत्पादन, वन्यजीव संवर्धन, शिक्षण व संशोधन करण्यासाठी नवीन प्राणिसंग्रहालयाचा विकास करण्यात आला. त्यानंतर ‘राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र’ असे नामकरण करून नवीन प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला येथे हरीण, माकड, अस्वल, वाघ, हत्ती इत्यादीसाठी नैसर्गिक आभासाचे निवारे बांधण्यात आले.


येथे प्राण्यांवर उपचार करण्यासाठी विविध साधनांनी युक्त असे हॉस्पिटल आहे. प्राण्यांवर प्रतिबंधात्मक उपचारही केले जातात. या प्राणीसंग्रहालयास दरवर्षी १८ लाखांपेक्षा अधिक लोक भेट देतात. पर्यटकांच्या सोयीसाठी बसण्याकरिता सावली, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सूचना फलक, व्हीलचेअर इ. गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटक आणि विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सन १९८६ साली स्थापन करण्यात आलेले जुने सर्पोद्यान देखील या नवीन प्राणिसंग्रहालयात समाविष्ट करण्यात आले. इ.स. १९८६ मध्ये नीलम कुमार खैरे यांनी ते वसवले. ते सर्पोद्यानाचे पहिले संचालक होते. सर्व जातींचे सर्प, सरपटणारे प्राणी आणि प्राणिजगतातील अनेक जीवांना येथे संरक्षण देऊन त्यांचे संवर्धन केले जाते. सापासारख्या प्राणघातक समजल्या जाणाऱ्या प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ही संस्था अनेक कार्यक्रम आयोजित करते.

काही माशांच्या प्रजाती आणि माशांची शिकार करून राहणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. तसेच इतर पक्ष्यांमध्ये गरुड, ससाणा, घार, जंगली कोंबडी पहायला मिळतात. शिकारी प्राण्यांमध्ये सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे आहेत. चौशिंगा, चितळ, हरिण, ठिपके असलेले हरिण, अस्वल, नीलगाय, आशियाई हत्ती, गवा, चिंकारा असे प्राणी बघायला मिळतात. विविध विषारी, बिनविषारी सरपटणारे प्राणी, पक्षी आणि अनेक जंगली प्राणी येथे पहायला मिळतात. तेथे बसने किंवा खासगी वाहनाने जाता येते. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत भेट देऊ शकता.






18,903 वेळा पाहिलं