मुंबईत सुविधा केंद्रांचा झपाट्याने विस्तार – लाखो नागरिकांना लाभ

मुंबईमध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबवण्यात येत असलेला ‘सुविधा केंद्र’ उपक्रम शहरी स्वच्छता, पाणी बचत आणि आरोग्य संवर्धनासाठी पथदर्शी ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला नवचैतन्य मिळाले असून विविध संस्थांचा सहभाग या प्रयत्नांना अधिक बळ देत आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू झालेला हा प्रकल्प अल्पावधीतच उल्लेखनीय परिणामकारक ठरला आहे. सध्या शहरात तेवीस सुविधा केंद्रे कार्यरत आहेत, तर चोवीसावे केंद्र लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय आणखी दोन केंद्रांचे काम सुरू असून सात केंद्रांचे प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका, एचएसबीसी आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या सहकार्यामुळे या योजनेचा भविष्यात अधिक विस्तार होणार आहे.

शहरातील झोपडपट्ट्या आणि वंचित वस्त्यांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणाऱ्या स्वच्छता सुविधा पुरविणे ही या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे आहेत. आतापर्यंत साधारण पाच लाखांहून अधिक नागरिकांना या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ झाला असून आरोग्यदृष्ट्याही हे मॉडेल अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः महिलांसाठी सुरक्षितता, बालकांसाठी स्वच्छ जागा आणि दिव्यांगांसाठी सुलभ रचना या वैशिष्ट्यांमुळे सुविधा केंद्रे लोकाभिमुख ठरतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना सार्वजनिक-खासगी भागीदारीतून निर्माण झालेला हा आदर्श नमुना मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या महानगरासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. या केंद्रांमध्ये स्वच्छता, लोकसहभाग, वर्तणूक बदल, आर्थिक आणि पर्यावरणीय शाश्वतता तसेच कार्यक्षम व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे शहरी महाराष्ट्रात आणखी अशी केंद्रे उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

या सुविधा केंद्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश. पाणी बचत, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाच्या पद्धतींमुळे हे केंद्र पर्यावरणीय शाश्वततेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. त्यामुळे स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरण रक्षण यांचे संतुलित आणि दीर्घकालीन समाधान म्हणून हा उपक्रम मुंबईकरांसाठी आशादायी ठरत आहे.






12,085 वेळा पाहिलं