भारतामध्ये विषाणूजन्य संसर्गात झपाट्याने वाढ

भारतात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या 2025च्या वार्षिक अहवालात या बाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. देशभरातून तपासण्यात आलेल्या चार लाख पंच्याहत्तर हजाराहून अधिक नमुन्यांपैकी अकरा टक्के नमुन्यांमध्ये विषाणूंचा संसर्ग आढळला आहे. या वाढत्या प्रमाणामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत जानेवारी ते मार्च 2025 तपासलेल्या दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे छप्पन नमुन्यांपैकी दहा पूर्णांक सात टक्के चोवीस हजार पाचशे दोन नमुने संसर्गित आढळले. तर दुसऱ्या तिमाहीत एप्रिल ते जून 2025 तपासलेल्या दोन लाख सहा हजार पंच्याण्णव नमुन्यांपैकी अकरा पूर्णांक पाच टक्के सव्वीस हजार पंचावन्न नमुने संक्रमित आढळले. म्हणजेच, संसर्गदरात सुमारे शून्य दशांश आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या नमुन्यांच्या तपासणीतून देशात प्रमुखत्वे इन्फ्लूएंझा ए, डेंगू, हेपेटायटिस ए, नोरोव्हायरस आणि हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस या विषाणूंचा प्रभाव सर्वाधिक असल्याचे दिसून आले. या आजारांमुळे श्वसन संसर्ग, तीव्र ताप, पिवळा कावीळ, अतिसार आणि मेंदूज्वर यांसारखे गंभीर आजार उद्भवत आहेत. शहरी भागांतील गर्दी, अपुरी स्वच्छता आणि बदलते हवामान हे या विषाणू प्रसाराचे मुख्य कारण ठरत असल्याचेही अहवालात नमूद आहे.

आयसीएमआरच्या मते, लोकसंख्या वाढ, झपाट्याने होणारे नागरीकरण, पर्यावरणातील बदल, आणि आरोग्य सेवांमधील मर्यादा ही परिस्थिती आणखी गंभीर बनवत आहे. हवामानातील अनिश्चितता आणि पावसाळ्यातील तापमानातील बदलांमुळे डेंगी, फ्लू आणि हेपेटायटिस सारख्या आजारांच्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. या विषाणूजन्य आजारांचा धोका ग्रामीण तसेच शहरी दोन्ही भागांत वाढताना दिसत आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारताची लोकसंख्या मोठी असल्याने संसर्गदर तुलनेने कमी वाटतो; तथापि, भविष्यात नवीन विषाणूंचा उद्रेक, हवामानातील अस्थिरता आणि सामाजिक बदलांमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष देणे, लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय यांचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.






17,602 वेळा पाहिलं