नात्याला असावा आपुलकीचा स्पर्श

प्रेम-आपुलकीचे बंध लाभलेले नातेसंबंध व्यक्तीला आनंदी जीवन प्रदान करतात. एकदा नात्यात अविश्वास निर्माण झाला की, ते परत जुळविणे खूप अवघड होऊन बसते. जरी ते कसे तरी जोडले गेले तरी ते आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. मैत्री, भाऊ-बहीण, नवरा-बायको अशा कोणत्याही नात्यात असे मतभेद पहायला मिळतात. पती-पत्नीच्या नात्यावर त्याचा वेगळाच परिणाम होतो. एकदा विश्वास तुटला की पुन्हा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे खूप कठीण होऊन बसते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात विश्वास संपादित करता आला पाहिजे.

नात्यातील कटुता जीवनात अस्वस्थता निर्माण करते. परस्परांतील संबंध बिघडवते. त्यामुळे आनंद नाहीसा होऊन दु:ख पसरते. याचा परिणाम मनाबरोबरच शरीरावरही होतो. मानसिक स्वास्थ्य बिघडते; परिणामी शारीरिक समस्याही सुरू होतात. कोणतीही व्यक्ती कायमस्वरुपी एकांतात राहू शकत नाही. आनंदी जीवनासाठी नाती फार महत्त्वाचे असतात. हे महत्त्व लक्षात घेऊन नाती सांभाळता आली पाहिजेत. शक्य तिथे कमीपणा घेता यायला हवा. परस्परांचा आदर करता यायला हवा. यामुळे नाती सशक्त होतात.

काही कारणास्तव समोरची व्यक्ती आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नसेल, किंवा समोरासमोर बसून एकमेकांशी बोलत नसाल, तर अशा वेळी नाती अधिक बिघडतात. जेव्हा कधी आपल्याकडून चूक होते, तेव्हा ती पुन्हा-पुन्हा करण्यापेक्षा ती सुधारण्याचे काम करा. कोणत्याही प्रकारची माहिती लपवून तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या मनात शंका निर्माण करू नका. परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला आतून स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे.

आजकालच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे खूप अवघड झाले आहे. इतरांसाठी तर ते त्याहूनही जास्त आव्हानात्मक आहे. जर तुमच्या जवळची व्यक्ती एकटी असेल तर त्याला सहाय्य द्या. कधी-कधी एकटेपणा आणि अनावश्यक चिंता यामुळे निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला चुकीची पावले उचलण्यास भाग पाडते. अशा परिस्थितीत तुमचा पाठिंबा त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.







15,898