काजू उत्पादकांना दिलासा — जयगड बंदरातून निर्यात वाढविण्याचे नियोजन
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जयगड बंदरातून काजू निर्यातीबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लाड तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जयगड बंदरातून काजू निर्यात सुलभ करण्यासाठी आवश्यक परवानग्या, अधोसंरचना आणि प्रशासकीय प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, जयगड बंदरातून काजू निर्यात वाढल्यास राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे या बंदरातून काजू निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व परवान्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत पणन मंडळ, स्मार्ट व मॅग्नेट, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण तसेच रेल्वे विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या सर्व विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करून निर्यातीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
मंत्री राणे यांनी पुढे सांगितले की, जयगड बंदराचे भौगोलिक स्थान आणि वाहतूक सुविधा या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहेत. त्यामुळे या बंदरातून काजू निर्यातीस गती मिळाल्यास कोकणातील काजू उद्योगाला नवे बळ मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. यासाठी सर्व विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.