कोल्हापूरचे रेणुका मंदिर

महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये प्रसिध्द रेणुका मंदिर असून हे मंदिर कोल्हापूर बस स्थानकापासून १० मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे रेणुकादेवी, मातंग देवी आणि परशुराम अशी देवस्थाने आहेत. रेणुका देवीला ‘ओढ्यावरची यल्लमा’ असेदेखील म्हणतात.

कर्नाटकातील बेळगाव येथील सौंदत्ती हे तिचे मुख्य स्थान आहे. ही देवता कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या प्रांतांतील लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. ‘यल्लम्मा’ या कानडी शब्दाचे ‘सर्वांची माता’ आणि ‘सप्तमातृका’ असे अर्थ आहेत.

या स्थळाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. गंधर्वांची जलक्रीडा पाहताना रेणुका विचलित झाली. जमदग्नीच्या आज्ञेवरून परशुरामाने तिचा वध केला. तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मातंगीच्या धडाला जोडले गेले. जिवंत झालेल्या दोघींपैकी एक -‘यल्लम्मा’ व दुसरी ‘मरिअम्मा’ बनली. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून ‘लज्जागौरी’, ‘एकवीरा’, ‘जोगुळंबा’, ‘भूदेवी’, ‘मातंगी’, ‘यमाई’ व ‘सांतेरी’ ही तिचीच रूपे होत, असे अभ्यासकांना वाटते.

हे एक अतिशय जागृत देवस्थान आहे. येथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. प्रशासनाच्या वतीने गर्दी होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जाते. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे रोज सकाळ-संध्याकाळ देवीची महाआरती करण्यात येते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. हे मंदिर हे रस्त्याला लागूनच आहे. मंदिराच्या मागे वाहनतळाचीही सोय आहे.






15,245 वेळा पाहिलं