रेवदंडा किल्ला

मुंबईपासून जवळच असलेले रेवदंडा हे ऐतिहासिक काळापासून एक महत्त्वाचे बंदर राहिले आहे. या ठिकाणी असलेला रेवदंडा किल्ला हा सोळाव्या शतकात बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरून आजूबाजूच्या परिसराचे आणि अथांग समुद्राचे अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य दिसते. विशेषतः सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात, अलिबाग जवळ असणारा हा किल्ला ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. खाडीच्या मुखावर वसलेला हा किल्ला पोर्तुगीज आणि मराठा साम्राज्याच्या सत्ता संघर्षाचा मोठा साक्षीदार आहे. पोर्तुगीज व्हाइसरॉय डॉम कॉन्स्टँटिनो डी ब्रागांझा याने १५५८ मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली, हे बांधकाम १५७० मध्ये पूर्ण झाले. या किल्ल्याला फोर्ट सेंट एंजेलो किंवा फोर्टलेझा डी चोल या नावानेही ओळखले जात होते. हा किल्ला चौल या प्राचीन बंदराचे आणि शहराचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. तब्बल दीडशे वर्षे हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. पोर्तुगीजांनी येथे तटबंदी, चर्च आणि वसाहत उभारली. १७४० मध्ये, बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र चिमाजी अप्पा यांनी एका निर्णायक लढाईनंतर पोर्तुगीजांचा पराभव केला आणि रेवदंडा किल्ला मराठा साम्राज्यात समाविष्ट केला. हा विजय मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

रेवदंडा किल्ला पोर्तुगीज स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. हा किल्ला आयताकृती असून, त्याचा विस्तार सुमारे पाच किलोमीटरच्या परिघामध्ये होता. हा किल्ला मजबूत विटा आणि चुन्याचा वापर करून बांधलेला आहे. किल्ल्याची तटबंदी तीस ते चाळीस फूट उंच असून, तिला अनेक मजबूत बुरूज आहेत. समुद्राकडून येणाऱ्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी समुद्राच्या बाजूची तटबंदी अधिक भक्कम आणि उंच बनवण्यात आली होती. किल्ल्याला एकूण अकरा बुरुज आणि चार प्रवेशद्वार होती. पोर्तुगीज काळात किल्ल्याच्या आत अनेक इमारती होत्या, ज्यात चर्च, शाळा, पाण्याची टाकी आणि सरकारी कार्यालये यांचा समावेश होता. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे सेंट बारबरा चर्च.

सध्या रेवदंडा किल्ला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. मात्र, आजही किल्ल्याच्या भव्य तटबंदीचे काही भाग, बुरुजांचे अवशेष, जुन्या इमारतींचे पाया आणि पोर्तुगीजांनी बांधलेले सेंट बारबरा चर्चचे अवशेष ज्यामध्ये घंटा बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. हा किल्ला इतिहासप्रेमी, स्थापत्यशास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून रेवदंडा खाडी आणि समुद्राचे सुंदर दृश्य दिसते.

रेवदंडा किल्ला मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून सहज पोहोचण्यासारख्या अंतरावर आहे. जवळचे शहर अलिबाग असून ते सतरा किमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून किंवा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन पेण गाठावे लागते. तिथून अलिबागच्या दिशेने जावे लागते. रेवदंडा हे अलिबाग-मुरुड रस्त्यावर स्थित आहे. एसटी बस, खासगी टॅक्सी किंवा स्वत:चे वाहन हे प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवापर्यंत बोटीने प्रवास करता येतो. मांडवा येथून रेवदंडा किल्ल्यापर्यंत बस किंवा रिक्षाने जाता येते.

रेवदंडा किल्ला हा महाराष्ट्रातील असा ऐतिहासिक वारसा आहे, जो पोर्तुगीज आणि मराठा या दोन संस्कृतींच्या खुणा आजही जपून ठेवलेल्या आहेत.






18,950 वेळा पाहिलं