आयएनएसव्ही कौंडिण्यचे पुनरुज्जीवन – मस्कतची ऐतिहासिक सफर

भारताच्या गौरवशाली समुद्री इतिहासाला उजाळा देण्यासाठी भारतीय नौदलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले आयएनएसव्ही कौंडिण्य हे जहाज आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी सज्ज झाले असून, २९ डिसेंबर २०२५ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथून ओमानमधील मस्कतसाठी रवाना झाले आहे. ही केवळ एक समुद्रसफर नसून, हजारो वर्षांपूर्वीच्या भारताच्या सागरी मार्गांना आणि संस्कृतीला पुन्हा जिवंत करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे.

आयएनएसव्ही कौंडिण्य या जहाजाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बांधणी आहे. हे जहाज कापड शिवणे या प्राचीन तंत्राचा वापर करून बनवण्यात आले आहे. यामध्ये लाकडी फळ्यांना जोडण्यासाठी खिळे किंवा कोणत्याही धातूच्या सामग्रीचा वापर न करता, त्या नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या दोऱ्यांनी शिवल्या जातात. त्यानंतर ते पूर्णपणे जलरोधक करण्यासाठी त्यावर नैसर्गिक राळ आणि तेलाचा लेप लावला जातो. हे तंत्रज्ञान सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतात प्रचलित होते. या जहाजाची रचना अजंठा लेण्यांमधील पाचव्या शतकातील एका चित्रावरून प्रेरित आहे. त्याकाळी भारतीय व्यापारी आणि दर्यावर्दी याच प्रकारच्या जहाजांतून अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातून प्रवास करत असत. केरळमधील पारंपारिक कारागिरांनी श्री बाबू संकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हे जहाज साकारले आहे.

पोरबंदर ते मस्कत हा प्रवास म्हणजे भारताच्या प्राचीन व्यापारी मार्गांचे पुनरावलोकन आहे. एकेकाळी याच मार्गाने भारतीय मसाल्यांची, कापडाची आणि हिऱ्यांची आखाती देशांशी देवाणघेवाण होत असे. या मोहिमेचे मुख्य उद्देश  भारताच्या प्राचीन नौकानयन कलेचे आणि जहाजबांधणीच्या स्वदेशी कौशल्याचे प्रदर्शन करणे, भारत आणि ओमान यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना उजाळा देणे, आधुनिक काळातही प्राचीन तंत्रज्ञानाची उपयुक्तता तपासणे आणि त्याद्वारे जगाला भारताच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देणे, हा आहे.

या जहाजाचे नाव प्राचीन भारतीय नाविक कौंडिण्य यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, त्यांनी प्राचीन काळी भारतापासून आग्नेय आशियापर्यंत प्रवास केला होता. आयएनएसव्ही कौंडिण्यवर आधुनिक दळणवळणाची साधने आणि सुरक्षा उपकरणे असली, तरी त्याचे मुख्य संचालन पारंपारिक पद्धतीने शिडांच्या मदतीने केले जाते. या मोहिमेत नौदलाचे चार अधिकारी आणि तेरा खलाशी अशा एकूण सतरा जणांचा समावेश आहे. पोरबंदरमध्ये वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी ओमानचे राजदूत इसा सालेह अल शिबानी देखील उपस्थित होते.






20,649 वेळा पाहिलं