अमेरिकेत नद्यांची पातळी घटली – पाणीटंचाईची स्थिती

अमेरिका एकीकडे हिमवादळाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या पश्चिम भागातील राज्यांमध्ये पर्वतीय क्षेत्रातील पाऊस, हिमवर्षाव यांच्या निच्चांकामुळे, शहर आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्यावर त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत. पश्चिम अमेरिकेतील बहुतेक नद्यांना आणि जलाशयांना पर्वतांवरील बर्फ वितळल्यानंतर पाणी मिळते. यंदाच्या वर्षी दोन प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे. काही भागात पाऊस किंवा बर्फ दोन्ही पडलेले नाहीत. काही भागात पाऊस झाला आहे, परंतु तापमान जास्त असल्यामुळे त्याचे रूपांतर बर्फात होऊ शकलेले नाही. वॉशिंग्टन, ओरेगॉन, कोलोरॅडो आणि यूटा यांसारख्या राज्यांमध्ये बर्फाचे प्रमाण सरासरीच्या केवळ पन्नास ते साठ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

कोलोरॅडो ही नदी अमेरिकेतील सात राज्यांतील सुमारे चार कोटी जनतेला पाणी पुरवते. मात्र, यंदाचा ओघ कमी झाल्यामुळे लेक मीड आणि लेक पॉवेल यांसारख्या मोठ्या धरणांमधील पाणीपातळी ऐतिहासिक निचांकी पातळीवर जाण्याची भीती आहे. जर धरणांमधील पाणीपातळी आवश्यक स्तरापेक्षा खाली गेली, तर वीजनिर्मिती थांबण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम वीज दरांवर होईल. कॅलिफोर्निया आणि कोलोरॅडोमधील शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील पिकांसाठी पाणी मिळणे कठीण होईल. विशेषतः गव्हाच्या पिकाला संरक्षणात्मक बर्फाचे आवरण न मिळाल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा बहुअब्ज डॉलरचा स्की उद्योग संकटात सापडला आहे. बर्फ नसल्यामुळे अनेक रिसॉर्ट्स सुरू होऊ शकलेले नाहीत, ज्यामुळे पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे.

बर्फ कमी पडल्यामुळे उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा लवकर निघून जाईल. यामुळे जंगले कोरडी पडून वणवे लागण्याचा धोका वाढला आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने सर्वात भीषण वणव्यांचा सामना केला असून, हिम वर्षावाचा निच्चांक हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या संकटावर मात करण्यासाठी अमेरिका आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. इंटेलॅक्टिया सारख्या एआय टूल्सचा वापर करून आता पाणीपुरवठ्याचे अधिक अचूक नियोजन केले जात आहे. कोलोरॅडो आणि यूटा सारख्या राज्यांनी कृत्रिम पावसाद्वारे किंवा बर्फवृष्टीद्वारे पाण्याचे स्त्रोत वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.






3,924 वेळा पाहिलं