सिंधुदुर्गातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सचेत पोर्टल
सिंधुदुर्गच्या अथांग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि किनारपट्टीच्या रक्षणासाठी सचेत पोर्टल आणि एसएसबी यंत्रणेच्या माध्यमातून एक विशेष सुरक्षा कवच कार्यान्वित करण्यात आले आहे. कोकणात होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, चक्रीवादळ किंवा वीज पडणे यांसारख्या संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी सचेत पोर्टल वापरले जाते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच या पोर्टलचा वापर समुद्रकिनारी पर्यटनासाठी करण्यात येत आहे. समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सावधगिरीचे संदेश पाठवले जात आहेत. यामध्ये समुद्रात उतरताना घ्यायची काळजी, भरती-ओहोटीच्या वेळा आणि संभाव्य धोक्यांची माहिती दिली जात आहे.
सिंधुदुर्गची किनारपट्टी भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. सागरी मार्गाने होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सागर सुरक्षा कवच मोहिमेअंतर्गत विशेष लक्ष दिले जात आहे. किनारपट्टीवरील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, कोस्ट गार्ड आणि सीमा सुरक्षा बलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संशयास्पद बोटी किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची त्वरित माहिती देण्याचे आवाहनही स्थानिकांना करण्यात आले आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली, निवती आणि देवगड यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी मांदियाळी असते. अनेकदा पर्यटक उत्साहाच्या भरात समुद्रात खोलवर जातात, ज्यामुळे बुडण्याच्या दुर्घटना घडतात. हे रोखण्यासाठी सचेतद्वारे मिळणारे अलर्ट पर्यटकांना सजग करत आहेत. प्रशासनाकडून ठिकठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात आले असून ध्वनिक्षेपकावरूनही सूचना दिल्या जात आहेत.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग किनारपट्टीवर रेड टीम आणि ब्लू टीम असे विभाग करून सुरक्षा सराव देखील राबवले जातात. ‘सचेत पोर्टल’मुळे आता केवळ सरकारी यंत्रणाच नाही, तर प्रत्यक्ष पर्यटक आणि स्थानिक नागरिकही सुरक्षेच्या साखळीत जोडले गेले आहेत. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक आणि नियंत्रण कक्षाची माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित केली जात आहे. पूर्वी केवळ रेडिओ किंवा बातम्यांच्या माध्यमातून धोक्याची सूचना दिली जात असे. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या मदतीने थेट पर्यटकांच्या मोबाईलवर माहिती पोहोचत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. सचेतमधील हे तंत्रज्ञान इस्रो आणि इतर हवामान संस्थांशी जोडलेले असल्याने यातील माहिती अत्यंत अचूक असते. सिंधुदुर्गचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सचेत पोर्टल आणि एसएसबीच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे पर्यटकांना निर्धास्तपणे निसर्गाचा आनंद घेता येईल, तसेच किनारपट्टीची सुरक्षाही अभेद्य राहील.