महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते विराजमान
भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ आणि अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सदानंद दाते यांनी महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळत्या महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी कुलाबा येथील पोलीस मुख्यालयात सदानंद दाते यांच्याकडे ही महत्त्वाची सूत्रे सुपूर्द केली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करणे आणि आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी दाते यांची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे पोलीस दलातील विविध विभागांमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून दिल्लीत काम केले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील एटीएस प्रमुख आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांसारख्या महत्त्वाच्या पदांची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
सदानंद दाते यांचे नाव मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी गाजले होते. कामा हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले होते. या लढाईत ते जखमी झाले होते, मात्र त्यांनी आपला लढा सोडला नाही. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची प्रतिमा एक अत्यंत प्रामाणिक काम करणारे अधिकारी अशी आहे. राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ वादात आणि चर्चेत राहिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेल्या तक्रारींमुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांची पुन्हा नियुक्ती झाली होती. आता सदानंद दाते यांच्या नियुक्तीमुळे रश्मी शुक्ला या पदावरून मुक्त झाल्या असून, दाते यांच्याकडे पूर्णवेळ जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने असणार आहेत. राज्यात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे. राज्यातील तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ड्रग्ज फ्री मोहीम अधिक तीव्र करणे. तळागाळातील पोलीस ठाण्यांना हाय-टेक सुविधा पुरवणे आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे. संघटित गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक अंमलबजावणी करणे. सदानंद दाते यांच्यासारख्या निष्कलंक चारित्र्याच्या आणि अनुभवी अधिकाऱ्याकडे राज्याच्या पोलीस दलाची कमान आल्याने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे. पोलीस मुख्यालयात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्याच्या सुरक्षा स्थितीचा प्राथमिक आढावा घेतला.