गोव्याच्या किनारी होणार समर- स्वानंदीचा भव्य विवाह सोहळा

झी मराठीवरील अगदी कमी वेळात प्रेक्षकाच्या पसंतीस उतरलेली लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या एका खास वळणावर पोहोचली आहे. मालिकेत समर आणि स्वानंदी या जोडीचा विवाह सोहळा गोव्याच्या मोहक समुद्रकिनारी मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. गोव्याचा निसर्गरम्य परिसर आणि खळखळून वाहणाऱ्या लाटा अशा अद्भुत देखावा असणाऱ्या ठिकाणी रंगणारा हा विवाह सोहळा प्रेक्षकांसाठी एक अनोखा क्षण ठरणार आहे.

या मालिकेत समरची भूमिका अभिनेता सुबोध भावे तर स्वानंदीची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत आहे. गोव्यातील तीन दिवस चाललेल्या या विशेष शूटिंगदरम्यान तेजश्रीने समाज माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की “ही दृश्यं साकारताना संपूर्ण टीमने अत्यंत उत्साहाने आणि समर्पणाने काम केलं. समुद्रकिनाऱ्यावरील ४० ते ४५ डिग्री तापमानातही प्रत्येकाने आपल्या बाजूने हे काम सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला आहे. इतक्या सुंदर लोकेशनवर शूटिंग करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय होता.” असंही ती म्हणाली.

वधू-वरांच्या पोशाखांपासून ते सजावटीपर्यंत प्रत्येक तपशीलावर काटेकोरपणे लक्ष दिलं गेलं आहे. पारंपरिक वेशभूषा, सुंदर फुलांच्या सजावटी आणि सिनेमॅटिक दृश्यरचना यामुळे हा विवाहसोहळा प्रेक्षकांना नवीन जगात नेणारा ठरणार आहे. दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ ते १२ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान प्रसारित होणाऱ्या भागांत प्रेक्षकांना या भव्य विवाह सोहळ्याचे विशेष भाग बघता येणार आहेत.

या भागांत धमाल, रोमांचक आणि भावनिक अशा अनेक क्षणांची सांगड असून मालिकेतील काही कलाटणी देणाऱ्या प्रसंगांमुळे ही मालिकेला कुठल्या वळणावर जाईल हे ही पाहणे प्रेक्षकांसाठी महत्वाचे ठरणार आहे. झी मराठी वाहिनी पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा विवाह सोहळा एक अविस्मरणीय अनुभव देणारा आणि मनोरंजनाची मेजवानी असणारा सोहळा ठरणार आहे. सध्या समाज माध्यमांवर आणि मालिकेला मिळालेल्या चांगल्या रेटिंगवरून एकंदरीतच या मालिकेबद्दल प्रेक्षकांची असलेली ओढ आणि पसंती पाहायला मिळत आहे.






23,807 वेळा पाहिलं