अफजलखानाची भूमिका साकारत संजय दत्त करणार राजा शिवाजी चित्रपटातून पुनरागमन

प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नवा चित्रपट येणार आहे. आणि तो चित्रपट म्हणजे ‘राजा शिवाजी’ रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून या भव्य ऐतिहासिक चित्रपटात बॉलिवूडचा दमदार अभिनेता संजय दत्त ‘अफजलखान’ ही गाजलेली भूमिका साकारणार आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित असून त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे प्रतापगडचा संग्राम. या चित्रपटाचा केंद्रबिंदू असेल. महाराजांच्या विश्वासू ‘जिवा महाला’ ची भूमिका देखील चित्रपटात तितकीच ठसठशीत आणि भावपूर्ण स्वरूपात सादर केली जाणार आहे.

संजय दत्त यांच्या अफजलखानच्या भूमिकेमुळे या चित्रपटात अधिक ताकद आणि भव्यता येणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गांभीर्य, तीव्रता आणि अभिनयातील वजन या ऐतिहासिक पात्राला नवे रूप देणार आहेत. दुसरीकडे, रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव घेऊन येत आहेत.

‘राजा शिवाजी’चे चित्रीकरण महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांवर आणि भव्य सेट्सवर होत असून युद्धदृश्यं आणि पार्श्वसंगीताच्या माधुर्यामुळे हा सिनेमा दृश्यरम्य आणि भावनिक अनुभव ठरण्याची चिन्हं आहेत.

सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून संजय दत्तच्या अफजलखान रूपातील दमदार लुकबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. लवकरच प्रेक्षकांना “राजा शिवाजी विरुद्ध अफजलखान” हा ऐतिहासिक संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.






18,679 वेळा पाहिलं