सांस्कृतिक कार्य संचालनालय

महाराष्ट्रातील पारंपरिक कलेची जोपासना करुन कलेचा विकास करण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम, योजना, कार्यक्रम राबविले जातात. राज्य स्तरावर या कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई कार्यरत आहे. या संचालनालयामार्फत कला व सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रम राबविले जातात. महाराष्ट्र राज्य निर्मितीवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रंगमंचीय कलांचा विकास करण्याची जबाबदारी शासनाची आहे, या गोष्टीस मान्यता दिली. सन १९७० मध्ये मनोरंजन समितीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये रुपांतर करण्यात आले.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शासकीय पातळीवर सांस्कृतिक कार्यासंबंधीच्या योजना, उपक्रम कार्यान्वित करण्यात येतात. राज्यातील संस्कृतीची लोकांना माहिती व्हावी, कलाप्रकारांचा विकास व प्रसार व्हावा, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. संचालनालय राज्यातील वयोवृद्ध, अपंग, आर्थिक स्थैर्य नसलेल्या कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करते. सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदान देते.

कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कला क्षेत्रातील व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. संगीत व गायन क्षेत्रातील प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्याबद्दल एका ज्येष्ठ कलाकारास ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार प्रदान केला जातो. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता दिर्घकाळ आयुष्य वेचलेल्या, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी गुणांनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकारास ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जातो. मराठी चित्रपटसृष्टीत विशेष योगदान देणाऱ्या एका कलाकारास ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात येते. मराठी रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मराठी संगीत रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते.

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरीता दिर्घकाळ आयुष्य उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकारास ‘स्व. राज कपूर जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष योगदान देणाऱ्या एका कलाकारास ‘स्व. राज कपूर विशेष योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात येते. तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या एका लेखकास अथवा मान्यवरास ‘ज्ञानोबा तुकाराम’ पुरस्काराने गौरविण्यात येते. शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका कलाकारास ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते. संचालनालयामार्फत राज्याच्या कला-संस्कृतीचे प्रदर्शन करणारा चित्ररथ दरवर्षी राजपथ, नवी दिल्ली येथे पाठविण्यात येतो. राज्य नाट्य महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सव, संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, शाहिरी आणि दशावतार महोत्सव इत्यादी महोत्सव आयोजित करण्यात येतात. याशिवाय संचालनालय नाट्य, तमाशा, कीर्तन व शाहिरी प्रशिक्षण शिबिरेही आयोजित करते.