
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालानुसार एकूण एकतीस हजार सातशे छप्पन्न विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. निकाल बुधवार 9 जुलै 2025 रोजी सायंकाळी आठ वाजता परिषदेकडून अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.
गुणवत्तानिहाय यादीसह निकाल सर्व शाळांना त्यांच्या प्रवेश खात्यावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही यादी अंतीम असून, त्यावर कोणताही आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही. परीक्षेचा उद्देश गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ मिळणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शाळांनी निकाल व गुणवत्तानिहाय यादी प्रवेश खात्यावरून तात्काळ तपासावी. विद्यार्थ्यांना निकालाची माहिती वेळेत कळवावी आणि आवश्यक त्या शासकीय प्रक्रियांचे पालन करावे. निकालाबाबत काही अडचणी असल्यास परीषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. ही यादी अंतिम असून, पुनरावलोकनाची किंवा आक्षेपाची संधी नाही. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शाळांमार्फतच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाईल.
या निकालामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार मिळणार आहे. शासनाकडून राबवण्यात येणारी ही योजना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती देणारी ठरणार आहे. विशेषतः गावागावातील गुणवंत विद्यार्थी आता अधिक आत्मविश्वासाने शिक्षणात पुढे जाऊ शकतील.